ग्रामीण रुग्णालयाला रिक्तपदांचे ग्रहण; उपचारासाठी रुग्णांची परराज्यात धाव

जिल्ह्याचे शेवटचे टोक व आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील गरीब जनतेला योग्य दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली.

    सिरोंचा/गडचिरोली. तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब आदिवासी व गैरआदिवासी रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शहर मुख्यालयी शासनाने ग्रामीण रुग्णालयाची स्थापना केली. मात्र, रुग्णालयाला प्रारंभीपासूनच रिक्तपदांचे ग्रहण लागले असून त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. परिणामी गरीब रुग्णांना सीमेलगत असलेल्या परराज्यातील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

    जिल्ह्याचे शेवटचे टोक व आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील गरीब जनतेला योग्य दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली. मात्र, रुग्णालयात अद्यापही हवी तशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तसेच रुग्णालयात मंजूर 27 पदापैकी केवळ 19 पदांची भरती करण्यात आली आहे. आजही रुग्णालयात विविध अशी 8 पदांची भरती आरोग्य विभागाने अद्याप केलेली नाही. परिणामी उपस्थित कर्मचारी वर्गावर अतिरिक्त ताण पडत आहे. योग्य सुविधेअभावी रुग्ण शेजारील तेलंगणा राज्याच्या वरंगल, चेन्नुर, मंचिराल या ठिकाणी उपचारासाठी धाव घेत आहेत. महागाडे उपचार परवडणारे नाही. तसेच रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध असुनसुद्धा त्याचा लाभ फक्त गरोदर महिलांकरिता असुन ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा सतिश भोगे यांनी आहे.

    ही पदे रिक्त

    ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 चे मंजूर 1 पद सुरुवातीपासूनच रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 ची 3 पदे मंजूर असतांना 1 पद रिक्त, कनिष्ठ लिपिक वर्ग 3 चे 1 पद रिक्त, प्रयोग शाळा तंत्रज्ञ 1 पद, नेत्र चिकित्सक अधिकारी वर्ग 3 चे 1 पद रिक्त आहे. ‘क्ष’ किरण तंत्रज्ञ 1 पद रिक्त, अधिपरिचारिका मंजूर 7 पैकी 1 पद, शिपाई वर्ग 4 चे 1 पद रिक्त आहे. या ठिकाणी नेत्र चिकित्सा करण्यासाठी दर सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 यादरम्यान अहेरी उप जिल्हा रुग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी सेवा देत आहे.