Forest Department on target again; Panic spread among employees

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. जर 'पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला ठार मारू,' अशी धमकी सुद्धा दिली.

  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दोन वनरक्षकांवर माओवाद्यांनी जबर हल्ला केला आहे. माओवाद्यांनी त्यांना जंगलात नेऊन बेदम मारहाण केली आहे. तसेच, त्याचे  मोबाईल आणि जीपीएस यंत्र यावेळी हिसकावून घेण्यात आले. त्यामुळे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. या दोन्ही वनरक्षकांवर अहेरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

   
  विसागुंडा गावाजवळ वनतलावाचे काम सुरू होणार आहे. हे क्षेत्र नारगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत  या तलावाचे काम करण्यासाठी मंगळवारी युकेश राऊत आणि जागेश्वर सुरगाये हे दोन वनरक्षक या भागात गेले. या तलावाच्या कामासंबंधात  गावकऱ्यांशी चर्चा करून परत येत असताना विसामुडी नाल्याजवळ माओवाद्यांनी त्यांना अडविले.
   
  दोघांनाही जंगलात नेऊन झाडाला बांधले. तसेच, जर ‘पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला ठार मारू,’ अशी धमकी सुद्धा दिली. त्यांना मारहाण  करून त्यांची मोटारसायकल, मोबाईल, जीपीएस यंत्र (जमीन मोजणीचे) आणि नोंदवही हिसकावून घेतली. या घटनेने घाबरलेल्या वनरक्षकांनी आपली अत्यंत कसोशीने सुटका करून घेतली. आणि भामरागड पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी याची दखल घेत तक्रारही नोंदविलेली आहे.  
  त्या भागाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी तपास करून योग्य कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. तर, गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश भामरागडचे उपवनसंरक्षक पांडे यांना दिले आहेत.