गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांनी केला ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, रायफल आणि काडतूसांचा साठा जप्त

सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या नक्षलवादविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी साडेसात ते आठ दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये ५ नक्षलवादी ठार(5 naxalite killed in gadchiroli) झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

    गडचिरोली: मालेवाडा पोलीस मदत केंद्र हद्दीतील खोंब्रामेंढा व हेटाळकसाच्या जंगलात नक्षल विरोधी अभियान सुरु आहे. सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या नक्षलवादविरोधी अभियानात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी साडेसात ते आठ दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये ५ नक्षलवादी ठार(5 naxalite killed in gadchiroli) झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

    खोंब्रामेंढा- हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू आहे.या शिबीरामध्ये ६० ते ७०च्या संख्येत मोठ्या प्रमाणात नक्षली सहभागी झाली असल्याची माहिती सूत्रांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दिली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात जंगल परिसरात सी-६० पथकाने नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला सुमारे ६० ते ७० मिनिटे ही चकमक सुरु होती.

    पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मागावर असणारे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात तीन वेळा मोठी चकमक झाली. यामध्ये आज ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी पाच नक्षलवादी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    नक्षवाद्यांच्या पहिल्या ठिकाणावरुन ३०३ रायफल, काडतूस, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, २सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे.