गडचिरोलीत नक्षली व पोलीसांत चकमक, नक्षली घटनास्थळावरून पळाले

गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून त्यावर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाचा एक भाग म्हणून त्यांनी या भागातील गस्त आणि कारवाया वाढवल्या आहेत.

    भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी उडाल्या असून पोलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावत नक्षलवाद्यांचे मोठे शिबिर उध्वस्त केले आहे. यावेळी घटनास्थळावरून आईडी बॉम्ब तथा मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.

    भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याच्या गोपनीय माहितीवरून नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान अभियान राबविण्यास गेले असतांना रविवारी दुपारी साधरणत: साडेचार च्या सुमारास भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी अचानक अभियान पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

    तीनवेळा चकमक झाल्यावर नक्षली घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी त्या ठिकाणावरुन पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षली साहित्य व स्फोटके जप्त केली. अत्यंत शक्तिशाली स्फोटकं जागेवरच निकामी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या भागात नक्षल विरोधी अभियान तीव्र केलं आहे.

    गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून त्यावर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाचा एक भाग म्हणून त्यांनी या भागातील गस्त आणि कारवाया वाढवल्या आहेत.