नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव; पोलिसांकडून घातक साहित्य ताब्यात

घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे ३५ ते ४० नक्षलवादी शिबिर लावून होते असे दिसून आले. त्या ठिकाणावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्ट बॅग व नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

    गडचिरोली (Gadchiroli) : नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पाश्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. भामरागड तालुक्यातील जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलींचे शिबिर उद्ध्वस्त करण्यात आले. यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र चकमकीनंतर राबविलेल्या शोधमोहिमेत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

    भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून घातपात करण्याची योजना आखली होती.

    आयईडी, कुकर बॉम्ब केले नष्ट (IED, cooker bomb destroyed)
    चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे ३५ ते ४० नक्षलवादी शिबिर लावून होते असे दिसून आले. त्या ठिकाणावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्ट बॅग व नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्यातील आयईडी व कुकर बॉम्ब बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने जागेवरच नष्ट करण्यात आले.