थकित बिल भरा, अन्यथा पुरवठा खंडित करणार

महावितरण कंपनीच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी १३७ कोटी २९ लाखाच्या घरात पोहोचल्याने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

  • महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट

गडचिरोली. थकीत विद्युत बिलामुळे महावितरणची आर्थिक स्थिती दोलायमान झाली असून वारंवार नोटीस बजावूनही थकीत विद्युत बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आदींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीच्यावतीने देण्यात आला आहे.

महावितरण कंपनीच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी १३७ कोटी २९ लाखाच्या घरात पोहोचल्याने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. चालू वर्षातील मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडून ५८ कोटी १४ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक ग्राहकांकडून ११ कोटी ३८ लाख आणि औद्योगिक ग्राहकांकडून ५ कोटी ५१ लाख थकबाकी वसुली येणे आहे.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे ४ कोटी ७२ लाख तर सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडे ४ कोटी ७८ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती मिळून तब्बल ५२ कोटी ७२ लाख वसुली होणे बाकी आहे. यासंदर्भात भ्रमणध्वनी संदेशवजा तसेच छापील नोटिसी देण्यात आल्या आहेत. नोटिसी देऊन आला नोटिसांची मुदतही संपली आहे.

त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबत आता पाणीपुरवठा योजना, पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यास सामान्य जनतेची असुविधा थकबाकी न भरल्यामुळे होणार आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीजबिल त्वरित भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.