डाक कार्यालय भाड्याच्या खोलीत; नागरिकांसाठी सोयीसुविधांचा अभाव

देसाईगंज येथील डाक कार्यालयात सर्वात जास्त बचत खाती आहेत. या ठिकाणी ग्राहकांना उभे राहण्यासाठी दोन ते तीन फुटाची आयताकृती जागा आहे. वयोवृद्ध ग्राहकांना बसण्यासाठीही जागेच्या अभावी डाक विभागाकडून काहीही करता येत नाही.

    देसाईगंज. शहरातील ५३ हजार लोकसंख्येला डाक सेवा पुरविण्याची जबाबदारी येथील डाक विभागाच्या कार्यालयावर आहे. मात्र, हे कार्यालयच भाड्याच्या छोटेखानी इमारतीत असून येथे सोयीसुविधांचा अभाव आहे. परिणामी येथे येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
    देसाईगंज शहराची नगरपरिषद चंद्रपूर जिल्हा असताना १९६१ ला अस्तित्वात आली. सद्यस्थितीत देसाईगंज शहराची लोकसंख्या ५३ हजार एवढी आहे.

    आजघडीला उपविभागीय कार्यालयापासून ते तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद कर्मचारी वसाहत, पंचायत समिती, पंचायत समिती कर्मचारी वसाहत, वनविभाग वसाहत, उपवन संरक्षक कार्यालय, वखार महामंडळ आदी कार्यालयाच्या इमारतीत तयार झाल्या. मात्र आजतागायत भारतीय डाक विभागाच्या कार्यालयाला मात्र शहरात इमारत बांधकामासाठी जागाच न मिळणे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ, व्यापाराचे ठिकाण देसाईगंज आहे. येथील डाक विभागात सर्व प्रकारच्या नवनवीन योजना व विश्वसनीयताही आहे. परंतु जागेअभावी येथील कार्यालयीन काम करताना कोंडमारा होत आहे. भारतीय डाक विभागाची जिल्हा, तालुका मुख्यालयासह मोठ्या गावांमध्ये कार्यालये आहेत. या कार्यालयात पोस्ट मास्तर कार्यरत आहेत. तसेच पोस्टमन फिल्डवर्क सांभाळतो. डाक विभागाच्या विविध विमा योजना व बचत खाते, आरडी खाते असल्याने अपुऱ्या जागेत कामांचा पसारा सांभाळावा लागतो.

    इमारत बांधकाम करणे आवश्यक
    देसाईगंज येथील डाक कार्यालयात सर्वात जास्त बचत खाती आहेत. या ठिकाणी ग्राहकांना उभे राहण्यासाठी दोन ते तीन फुटाची आयताकृती जागा आहे. वयोवृद्ध ग्राहकांना बसण्यासाठीही जागेच्या अभावी डाक विभागाकडून काहीही करता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त तसेच प्रौढ स्त्री-पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आजघडीला शहरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून अत्यंत छोटेखानी भाड्याच्या जागेत असलेल्या डाक कार्यालयासाठी स्वतःच्या मालकीची इमारत होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जागा शोधून इमारतीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत उदासीनता दिसून येत आहे.