कोंढाळात पक्षी वाचवा उपक्रम

उन्हाळ्यामध्ये घराच्या छतावर किंवा परिसरात शक्य होईल तिथे पाण्याने भरलेल्या मोकळ्या तोंडाच्या बाटल्या, भांडी व इतर उपकरणांच्या सोयी पक्ष्यांकरिता उपलब्ध करून दिल्या.

    देसाईगंज. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून कोंढाळा येथे जिल्हा परिषद शाळा व मातोश्री ग्रूपच्यावतीने गावामध्ये व इतरत्र पक्षी वाचवा उपक्रम राबविण्यात आला.
    दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. उन्हाळा आला की पाण्यासाठी पक्षी व्याकुळ होताना दिसतात. कित्येकदा पाण्याअभावी पक्षी जीव सोडतात. काही दिवसांनी पक्ष्यांची केवळ चित्रेच बघायला मिळणार की काय? अशी अवस्था होणार आहे. पक्षी वाचविणे व त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी मार्ग काढून पक्ष्यांची संख्या कमी होऊ न देणे असे उपक्रम सर्वांनी राबविणे गरजेचे असते. यासाठी जिल्हापरिषद शाळा व मातोश्री ग्रूपने पक्ष्यांसाठी स्वत: चकोर तयार करून विद्या निकेतन शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत व गावातील सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय झाडांवर व इतरत्र ठिकाणी करून दिली.

    उन्हाळ्यामध्ये घराच्या छतावर किंवा परिसरात शक्य होईल तिथे पाण्याने भरलेल्या मोकळ्या तोंडाच्या बाटल्या, भांडी व इतर उपकरणांच्या सोयी पक्ष्यांकरिता उपलब्ध करून दिल्या. याप्रसंगी सरपंच अपर्णा नितीन राऊत उपस्थित होत्या. जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी, विद्या निकेतन शाळेचे शिक्षकवृ्ंद व विद्यार्थी, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. उपक्रमाप्रसंगी पक्षी वाचवा व निसर्ग हे आपल्यासाठी वरदान आहे. ते जपता आले पाहिजे. पक्ष्यांचे संरक्षण व निसर्गाची आपल्यावरील कृपा, उपकार व निसर्गाला जपणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन प्रियंका ठाकरे आणि गिरीष भजनकार यांनी केले.

    उपक्रमासाठी पाणी व भांड्याची सोय भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, ग्रापं सदस्य शेषराव नागमोती यांनी उपलब्ध करुन दिली. या उपक्रमातून अनेक विद्यार्थी व युवक प्रेरणा घेतील. तसेच अनेक पक्ष्यांची तहान भागेल, असे मत सुरज चौधरी यांनी व्यक्त केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शर्मिला झिलपे, स्नेहा सेलोटे, ऐश्वर्या शेंडे, दीपाली शेंडे, समता मेश्राम, प्रियंका ठाकरे, राकेश सोंदरकर, गिरीश भजनकर, मदन पचारे, निखील बोरुले, राजहंस बोरुले, आकाश राऊत, अभय भजनकार यांनी सहकार्य केले.