महाराष्ट्रातील सागवानाची तेलंगाणात तस्करी; साडेचार लाखांचा सागवान जप्त

सिरोंचा तालुक्यातील आसरअली कडून तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या ए पी-१५ टी ए ०३१४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनांची चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्याजवळ तपासणी केली असता, त्या वाहनातून सागवान फाट्या ३२ नग आणि साग छिलपट २२ नग असे एकूण ५४ नग १.९९७ घनमीटर जवळपास १ लाख ४० हजार १०७ रुपयांचा सागवान .....

    गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्रातून (Maharashtra) तेलंगणा (Telangana) राज्यात जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाची वनउपज तपासणी नाक्याजवळ झडती घेऊन चारचाकी वाहनसह तब्बल साडेचार लाखांचा सागवान (teak) जप्त केल्याची घटना आज सिरोंचा तालुक्यात घडली.

    गडचिरोली जिल्हा हा मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध आहे. सिरोंचा तालुक्यालगत छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून निदर्शनास येते. सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या आसरअली परिसरात यापूर्वीसुद्धा वनविभागाने कारवाई करत चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात सागवान जप्त केले होते.

    गोदावरी आणि प्राणहिता नदीवर दोन राज्यांना जोडणारा आंतरराज्यीय पूल झाल्याने याठिकाणी तीन राज्यांची रहदारी वाढली असून त्यासोबतच अवैध धंद्यांना सुद्धा उत आला आहे. त्यामुळेच वनविभागाने या ठिकाणी वनउपज नाका बसविले असतानासुद्धा मौल्यवान सागवान तस्करी काही थांबताना दिसत नाही.

    आज सिरोंचा तालुक्यातील आसरअली कडून तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या ए पी-१५ टी ए ०३१४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनांची चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्याजवळ तपासणी केली असता, त्या वाहनातून सागवान फाट्या ३२ नग आणि साग छिलपट २२ नग असे एकूण ५४ नग १.९९७ घनमीटर जवळपास १ लाख ४० हजार १०७ रुपयांचा सागवान माल तेलंगाना कडे घेऊन जात असताना आढळले.लगेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहन किंमत ३ लाख रुपये असे एकूण ४ लाख ४० हजार १०७ रुपये किमतीचा माल जप्त केला.

    वाहन चालक सारय्या नारायण नलबुगा (२७) रा.आसरअली, तालुका सिरोंचा, जिल्हा गडचिरोली याला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार आणि सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा चे वनपरिक्षेत्र अधिकारी कटकु व त्यांचे चमू करीत आहे.