मत्स्य चोरी रोखण्याकरिता विद्युत बल्ब लावायला गेला; विजेच्या धक्क्याने तिघांचाही जागीच मृत्यू

विद्युत बल्ब लावण्यासाठी मृतक राजू रामकृष्ण विस्वास शेतात गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने कुटुंबाने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आजी कमला मनिंद्र विस्वास शेतात शेजारच्या वीरकुमार सुभाष मंडल या छोट्या मुलाला घेऊन गेली.

    गडचिरोली (Gadchiroli) : तालुक्यातील राममोहनपूर (Rammohanpur) येथे १४ सप्टेंबर रोजी रात्री विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राजू रामकृष्ण विस्वास (१९), कमला मनिंद्र विस्वास (६५), वीरकुमार सुभाष मंडल (११) अशी मृतकांची नावे आहेत.

    आपल्या धान शेतातील मत्स्य तलावातून रात्री मत्स्य चोरीचा प्रकार होऊ नये म्हणून विद्युत बल्ब लावण्यासाठी मृतक राजू रामकृष्ण विस्वास शेतात गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने कुटुंबाने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आजी कमला मनिंद्र विस्वास शेतात शेजारच्या वीरकुमार सुभाष मंडल या छोट्या मुलाला घेऊन गेली.

    लहान मुलास शेतात गेलेल्या आजीला राजू हा बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला काय झालं आहे हे बघण्यासाठी पुढे जाऊन हात लावला असता आजी कमला विस्वास आणि वीरकुमार मंडल यांनाही विजेचा धक्का लागला.

    हे दोघेही घरी परत न आल्याने वासंती सुभाष विस्वास ही महिलाही शेतात गेली. तिथे तिघेही पडून होते. तेव्हा या महिलेनेही मृतकांना हात लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला हलका विद्युत धक्का बसला आणि हा सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. तेव्हा आक्रोश करत ही महिला गावाच्या दिशेने धावली आणि लोकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गावातील लोकांनी मेन ग्रिप काढून तिघांचेही मृतदेह घरी आणले. दरम्यान, या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.