Why is the only elephant camp in Maharashtra being shifted to Gujarat?

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील हा शासकीय हत्ती कॅम्प आहे. मुकेश अंबानी यांच्या खाजगी प्राणीसंग्रालयाची शोभा वाढविण्यासाठी पूर्व विदर्भातील सर्व ठिकाणच्या हत्तींना गुजरात येथे हलविणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    गडचिरोली : गडचिरोली येथील कमलापूर गाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नक्षलवाद्यांच्याच माहेरघर समजल्या जाणाऱ्या या गावाची आणखी एक विशेषता म्हणजे येथे  महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील हा शासकीय हत्ती कॅम्प आहे. हत्ती कॅम्पमुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आणि त्यामुळे कमलापूर गावाला महाराष्ट्रात एक विशेष ओळख प्राप्त झाली. शासकीय हत्ती कॅम्प म्हणून हे गाव ओळखले जाऊ लागले. परंतु, आता या हत्तींची रवानगी एका खाजगी प्राणिसंग्रहालयासाठी करण्याची तयारी सुरु आहे.

    गुजरात येथील जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कडून देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारले जात आहे. या जामनगर येथील हे संग्रहालय म्हणजे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी यांचा “ड्रीम प्रोजेक्ट” आहे, असे म्हटले जात आहे. 
     
    रिलायन्स इंडस्ट्रीजने जवळपास २५० एकर जागेमध्ये हे मोठे प्राणी संग्रहालय उभारले आहे. यात हत्ती, वाघ, बिबट असे विविध प्राणी असणार आहे. या संग्रहालय अशा प्राण्यांचा समावेश होणार आहे, ज्यांची देखभाल नीट तर्हेने  होऊ शकत नाही. अशा प्राण्यांनाच ‘रिलायन्स रेस्क्यू सेंटर’ मध्ये पाठविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्यातरी कमलापूर येथील हत्तींना कुठलाही धोका नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. असे असूनही  हत्तींना का हलविण्यात येत आहे, असा प्रश्न स्थानिक जनता आणि पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.