गोंदिया विदर्भात सर्वाधिक थंड; तापमान थेट १३ अंश सेल्सिअसवर

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच गुलाबी थंडीने सर्वांना खुश करून टाकले आहे. दिवाळीचा सण गुलाबी थंडी घेऊन आला व हिवाळ्याचे हे दिवस बहुतांश नागरिकांना आवडणारे असतात. मात्र, आता हीच थंडी आपला जोर दाखवत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे.

    गोंदिया (Gondia) : रविवारपासून जिल्ह्याचा पारा सातत्याने घसरत चालला असून, यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. सोमवारी तिसर्या क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा मंगळवारी (दि.९) मात्र सर्वांत थंड नोंदला गेला असून, जिल्ह्यातील किमान तापमान थेट १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. यात वादळी वातावरण अधिकची भर घालत असून, नागरिकांना आता सायंकाळी घराबाहेर पडताना विचार करावा लागत आहे.

    नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच गुलाबी थंडीने सर्वांना खुश करून टाकले आहे. दिवाळीचा सण गुलाबी थंडी घेऊन आला व हिवाळ्याचे हे दिवस बहुतांश नागरिकांना आवडणारे असतात. मात्र, आता हीच थंडी आपला जोर दाखवत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे. रविवारी (दि. ७ ) जिल्ह्यातील तापमान १५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते, तर सोमवारी (दि.८) किमान तापमान घसरून १५ अंश सेल्सिअसवर आले होते. त्यात आता मंगळवारी (दि.९) जिल्ह्याचे तापमान आणखी घसरले असून, थेट १३ अंश सेल्सिअसवर आले आहे.

    विशेष म्हणजे, आता थंडीचा जोर वाढत असतानाच त्यात ढगाळ वातावरणामुळे अधिकच भर पडत आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी दमदार पाऊस बरसला असून, आता ढगाळ वातावरणामुळेही थंडीचा जोर वाढण्यास मदत होत आहे. यामुळे आता सकाळी थंडी जाणवत असून सायंकाळी मात्र गरम कापडांचा वापर गरजेचा झाला आहे. रात्री उशिरा तर बोचरी थंडी घराबाहेर पडणे कठीण करत आहे.

    तापमानाची घसरण सुरूच
    रविवारी जिल्ह्याचे तापमान १५.५ अंश सेल्सिअस होते व नागपूरचेही तेवढेच असल्याने दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वांत थंड होते. सोमवारी जिल्ह्याचे तापमान १५ अंश सेल्सिअस होते व नागपूरचे तापमान १४.१ अंश सेल्सिअस असल्याने नागपूर सर्वांत थंड जिल्हा होता. मात्र, मंगळवारी गोंदिया जिल्ह्याचे तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, विदर्भात स्वांत थंड जिल्हा नोंदला गेला आहे. यामुळे आणखी काही दिवस जिल्ह्यातील तापमानाची घसरण कायम राहणार असे वाटते.