Only law enforcers will take false action, from whom can we expect the truth?

सालेकसा तालुक्यातील तीन लोकांवर अवैध दारू विक्रीची कारवाई केली होती. खोट्या आरोपीला बनावट गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकडण्याचा प्रकार आता या पोलिसांच्या अंगाशी आला आहे.

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी पाच पोलिसांना निलंबित केले आहे. पोलिसांकडून झालेल्या खोट्या कारवाईसाठी त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे. सालेकसा पोलीस ठाण्यातील या पाच पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले.

    डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला सालेकसा पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांनी देशी दारू पकडली होती. परंतु, त्यापैकी काही दारूच्या पेट्याना लपवत त्याची नोंद रेकॉर्डला दाखवली नव्हती. निलंबित पोलिसांनी ८ पेटी दारू आपल्या जवळील विशाल दासरिया, दीपक बासोने, भूषण मोहरे यांना दिली. त्यांनी त्या पेट्या चारचाकी वाहनाने सीलबंद करून नेल्या. पोलिसांनी त्यांना त्या पेट्या काही दिवसाकरिता आपल्या जवळ ठेवण्यास सांगितले. या युवकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. विशालने ही दारू आपल्या शेतात लपवून ठेवली. दोन-तीन दिवसांनी पोलिसांनी विशालला फोन केला. एका इसमाला पाठवून आठ पेटींपैकी दोन दारूच्या पेट्या देण्यास सांगितले. विशालने तसेच केले. तो इसम जाताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. उर्वरित, सहा पेटी दारू जप्त करून त्याला मारहाण केली. तसेच, विशालवर अवैध दारू विक्रीचा आरोप लावून गुन्हा दाखल केला. युवकांनी पोलिसांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्यांचे कोणीही ऐकले नाही. तसेच त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली.

    न्याय मिळण्यासाठी विशालने थेट गृहमंत्र्यांकडे धाव घेतली. तसेच, त्याने मानवाधिकार आयोग आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सुद्धा पत्राद्वारे हा सर्व प्रकार कळविला. त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली. शेवटी पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या अहवालानुसार या प्रकरणाच्या तपासअंती हा धक्कादायक प्रकार समोर आला.

    पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी यात पाच पोलिसांना निलंबित केले आहे. या प्रकरणात जनतेचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, शिपाई संतोष चुटे, शिपाई मधू सोनी अशी  निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.