
मोठ्या घाटांवरील वाळू तस्करी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे, वाळू तस्करांनी जंगलातील लहान - मोठ्या नद्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले असून वाळू चोरीचा सपाटा सुरू केला आहे. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहेत. घरकुल बांधकामासाठी वाळू आवश्यक आहे.
सडक अर्जुनी : तालुक्यातील पांढरी, कोसमतोंडी, चिरचाडी, डोंगरगाव, जांभळी आदी क्षेत्रातील वनविभाग व महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या नदी, नाल्यांतून रात्रीला वाळूचा अवैध उपसा होत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांचे पात्र पोखरले गेले आहेत, असे असले तरी वनविभागासह महसूल विभागाचे वाळू तस्करी रोखण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोणत्याही वाळू घाटाचे लिलाव झाले नाहीत. मोठ्या घाटांवरील वाळू तस्करी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे, वाळू तस्करांनी जंगलातील लहान – मोठ्या नद्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले असून वाळू चोरीचा सपाटा सुरू केला आहे. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहेत. घरकुल बांधकामासाठी वाळू आवश्यक आहे. ही बाब हेरून वाळू तस्करांनी वाळूचे दर तिप्पट – चौपट वाढविले आहेत. अव्वाच्या सव्वा दरात वाळू ची विक्री केली जात आहे. त्यामुळे, घरकुल लाभार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहेत.
परिसरातील साल ईटोला नदी व चुलबंद नदी हे वाळू तस्करांसाठी विशेष कुरण ठरत आहेत. नदीत पावसाळ्याच्या दिवसात वाहून आलेली चांगल्या प्रतीची वाळू असल्याने तस्करांनी येथील वाळूचा अवैध उपसा करून वाळुची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्याचा सपाटा सुरू केला आहे. विशेष म्हणजे ही वाळू तस्करी रात्रीला केली जात आहे. काही वाळू तस्कर दिवसाढवळ्याही वाळूची चोरी करीत आहेत. काही वीटभट्टी मालकदेखील वाळू तस्करी करीत आहेत. त्यामुळे, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळू तस्करांवर आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.