दोन डोके असलेल्या वासराचा जन्म; परिसरात चर्चेचा विषय

नवेगावबांध येथील आझाद चौकातील रहिवासी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे गायी आहेत. त्यातील एका गाईने शुक्रवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास एका वासराला जन्म दिला.

    नवेगावबांध (Navegaonbandh).  येथील आझाद चौकातील रहिवासी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे गायी आहेत. त्यातील एका गाईने शुक्रवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास एका वासराला जन्म दिला. या नवजात वासराला दोन डोके, चार डोळे आहेत. शारीरिक व्यंग असलेल्या विचित्र वासराचा जन्म झाल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

    हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. या वासराला चार पाय व दोन कान सामान्यपणे आहेत. दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे अनेक गायी, बैल आहेत. गोपालन हा त्यांचा छंदच आहे. यांत्रिक युगात शेतीची सर्व कामे शेतकरी यंत्रांच्या साहायाने करतात. त्यामुळे खेड्यातील गोधनदेखील कमी होत आहे. चाऱ्याची समस्यादेखील असताना उजवणे यांनी हा छंद जपला आहे. त्यासाठी दोन-तीन नोकर या गायी-बैलांच्या दिमतीला आहेत.

    शुक्रवारी, 4.15 वाजताच्या सुमारास हा निसर्गाचा चमत्कार घडला. त्यांच्याकडील एका पाळीव गायीने दोन डोके, चार डोळे असलेल्या वासराला जन्म दिला. दोन डोक्याचा वासरू उजवणे यांच्याकडे जन्माला आला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ झळकले. पाहता-पाहता त्यांच्या घरी बघ्यांची गर्दी जमली. गावात, परिसरात, सोशल मीडियावर हा चमत्कार चर्चेचा विषय झाला आहे.