धानपीक गर्भावस्थेत आले; युरियासाठी शेतकऱ्यांची पायपीट

तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, कृषी केंद्रांमध्ये युरिया खताचा तुटवडा असल्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची खतासाठी पायपीट सुरू आहे.

    तिरोडा (Tiroda).  तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, कृषी केंद्रांमध्ये युरिया खताचा तुटवडा असल्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची खतासाठी पायपीट सुरू आहे.

    तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पातून चिरेखनी, पुजारीटोला, मरारटोला, बेलाटी बु. मुंडीपार, मांडवी, बेलाटी खुर्द, सोनोली, भंबोडी, चांदोरी, बिरोली या गावांना सिंचनाकरिता पाणी देण्यात येते तर चांदोरी, सावरा, पिपरिया, अर्जुनी, बोंडरानी, गोंडमोहाडी, घोघरा, घाटकुरोडा या गावांना वैनगंगा नदीतून शेतकरी मोटारपंप लावून रब्बी पिकाची लागवड करतात. तसेच बोदलकसा प्रकल्पांतर्गत अनेक गावातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली आहे. सध्या धानपीक गर्भावस्थेत आला असून त्याला खताची आवश्यकता आहे.

    मागील १५ दिवसांपासून तालुक्यातील कृषी केंद्रावर युरिया खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी कृषी केंद्राचे चकरा माराव्या लागत आहे. वेळेवर खत उपलब्ध झाले नाही तर उत्पन्न कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.