राखी बांधण्यासाठी बहिणीकडे निघाला; पण रेल्वेच्या चाकाखाली सापडला

राखी सणासाठी तो रेल्वेगाडीने नागपूरवरून गोंदियाला येत असतांना त्याला गाडीतच झोप लागली. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटलेली गाडी टेमणी परिसरातून जात असताना त्याची झोप उघडली. गाडी हळू होतांना दिसल्याने धावत्या गाडीतून उडी घेतल्याने ......

    गोंदिया (Gondia) : मजुरीसाठी नागपूरला गेलेला भाऊरायाला बहिणीच्या हातून राखी बांधण्यासाठी २२ ऑगस्टच्या पहाटे नागपूरवरून गोंदिया येथे येण्यासाठी रेल्वेत बसला. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकावर (Gondia railway station) गाडी येईपर्यंत त्याला झोप लागली. गोंदिया रेल्वे स्थानक गेल्यानंतर झोप उघडल्याने धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादात गाडीतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

    राकेश गिरधारी धुर्वे (१९) रा. झरीया खैरलांजी बालाघाट असे मृतकाचे नाव आहे. गुदमा ते गोंदिया रेल्वे लाइन पोल क. ९९६/३०-३२ चे जवळील टेमणी नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळला. तो नागपूर येथे मजुरीचे काम करीत होता. राखी सणासाठी तो रेल्वेगाडीने नागपूरवरून गोंदियाला येत असतांना त्याला गाडीतच झोप लागली. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटलेली गाडी टेमणी परिसरातून जात असताना त्याची झोप उघडली. गाडी हळू होतांना दिसल्याने धावत्या गाडीतून उडी घेतल्याने रेल्वेच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

    पोलीस नायक मेहतलाल खल्लारी यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नायक देवाजी बहेकार, जीवन जाधव करीत आहेत.