नागपुरात मंगळवारी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; Corona Active रुग्णसंख्या पन्नाशी पलीकडे

    नागपूर (Nagpur): ‘युनिसेफ’कडून भारतात सणासुदींच्या दिवसांनंतर कोरोना प्रसाराचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासोबतच मास्कचा वापर अनिवार्य केला आहे; मात्र काही नागरिक कोरोना नियमावलींकडे दुलर्क्ष करताना आढळून येत आहे. याचा परिणाम पाहता नागपुरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढतीवर आहे. शहरात मंगळवारी 55 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून सांगण्यात आले. (Statistics of Corona Positive Patients for Tuesday, 20 September, 2021 in Nagpur)

    नागपूर शहरात मंगळवारी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर आणण्यासाठी नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाची टीम प्रामाणिकपणे मेहनत करीत आहे. रुग्णांवरील योग्य उपचारामुळे मंगळवारी 03 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजसुद्धा कोणत्याही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. 2269 कोरोना संशयित रुग्णांची आरोग्य विभागातर्फे कोरोना टेस्टिंग करण्यात आली. यापैकी 2253 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला.

    कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग नागरिकांच्या लसिकरणावर भर देत आहे. दरम्यान नागपूर शहरात मंगळवारपर्यंत 13 लाख 13 हजार 702 रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज देण्यात आला. 5 लाख 97 हजार 855 रुग्णांना कोरोनाची दुसऱ्या क्रमांकाची लस टोचण्यात आली. पितृपक्ष संपल्यानंतर बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास निमंत्रण मिळेल.

    नागरिकांनी कोरोनाचा संभावित धोका जाणून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या मोफत कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.