रागीट स्वभावानं केला घात; पत्नी आणि मुलीची गळा चिरून व्यक्तिनं स्वत: केली आत्महत्या

मारेकरी विलास एकलकोंड्या स्वभावाचे होते, मनातली गोष्ट कोणाला सांगत नव्हते. त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी झाली.

    नागपूर : जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीव नगर जवळील सरोदी मोहल्ल्यातील धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी व मुलीची हत्या करून इसमाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. विलास चंपतराव गवते 40 वर्ष याने काल मध्यरात्री आधी मुलगी  अंकिता (सुमारे 10) पत्नी रंजना  (सुमारे 35 वर्ष) यांची गळा कापून हत्या केली. नंतर विलासने स्वतः घराजवळील झाडाला फाशी घेतली.

    पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घराच्या शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या करणारा विलास रागीट स्वभावाचा होता. परिसरात तो कोणाशीही जास्त बोलत नव्हता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीनच्या सुमारास मुलगा जागा झाला त्याने जवळच झोपलेल्या आई आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. घरात वडील नाहीत, हे पाहिल्यानंतर तो उठून शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांच्या कडे गेला आणि सर्व घटना सांगितली…. नातेवाईकांनी विलासचा शोध घेतला. तेव्हा ते घराजवळच्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली.

    नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सरोदी मोहल्ल्यात कुटुंब प्रमुखाने पत्नी व मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना मानसिक असंतुलन व पत्नीवरील शंकेमुळे घडली असल्याचं बोललं जात आहे. मारेकरी विलास एकलकोंड्या स्वभावाचे होते, मनातली गोष्ट कोणाला सांगत नव्हते. त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी झाली.