विधान परिषद निवडणूकीत भाजपला नगरसेवक फुटण्याची भिती, 26 नगरसेवकांना पाठवलं गोव्याला

राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची मात्र निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहेत. तर, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. काल रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून भाजप नगरसेवकाचा एक गट गोवासाठी रवाना झाला.  निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भाजपने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरविले असून त्याअंतर्गत पहिला समूह गोव्याला रवाना झाला आहे.

    नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत नगरसेवक फुटू नयेत म्हणून भाजपने नगरसेवकांना पर्यटनावर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील बहुतांश भाजप नगरसेवकांना विविध राज्यात पाठवले जाणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह काही नगरसेवकांनाच शहरात राहता येणार आहे.

    राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची मात्र निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहेत. तर, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत.

    या निवडणुकीत ‘घोडेबाजार’ होण्याची शक्यता आहे. हा घोडेबाजार टाळण्यासाठी भाजप नगरसेवकांना पक्षाकडून नजरकैदेत ठेवले जात आहे.

    नागपूर महापालिकेत भाजपाचे 108 नगरसेवक असून, पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे मतांच्या बाबतीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षापेक्षा भाजपाचे पारडे जड आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला देखील आपले नगरसेवक पळवण्याची भीती असल्याने काँग्रेसने देखील रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

    काल रात्री उशिरा नागपूर विमानतळावरून भाजप नगरसेवकाचा एक गट गोवासाठी रवाना झाला.  निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून भाजपने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरविले असून त्याअंतर्गत पहिला समूह गोव्याला रवाना झाला आहे.

    मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा आणि अन्य भाजपशासित राज्यांत या नगरसेवकांना ठेवलं जाणार आहे. या नगरसेवकांना रेल्वे आणि विमानाने पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पक्षाने सर्व नगरसेवकांची आधारकार्डे मागविण्यात आली आहेत.