राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप सकारात्मक?

संख्याबळाचा विचार करता संजय उपाध्याय यांच्यासाठी सुमारे ३० ते ३५ आघाडीची मते फोडण्यासाठी भाजप आग्रही राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजप बिनविरोध निवडणूक घेण्यास तयार होईल आणि संजय उपाध्याय यांना अर्ज मागे घेवून काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा करतील अशीच शक्यता आहे

  नागपूर, राज्यसभा पोटनिवडणूक (Rajya Sabha by-election) बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील निश्चित बिनविरोध विजयी होतील अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया पटोले यानी व्यक्त केली आहे.

  निवडणूक बिनविरोध घेण्याबाबत सकारात्मक
  नागपूरात माध्यमांशी बोलताना राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची पंरपरा आहे. तशी विनंती आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.

  त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेवरून ते निवडणूक बिनविरोध घेण्याबाबत सकारात्मक राहतील, असे नाना पटोले म्हणाले.  राजीव सातव एप्रिल २०२० मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर १६ मे २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ पर्यंत आहे. पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जवळपास पाच वर्षे मिळणार आहेत.

  भाजपची काही मते फुटण्याचा धोका
  भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपला या जागेवर निवडणूक लढविण्यात फारसे स्वारस्य नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण या निवडणुकीसाठी येत्या चार ऑक्टोबरला मतदान झाले आणि आघाडीच्या बाजूने भाजपची काही मते फुटण्याचा धोका पत्करून निवडणूक जिंकणे फारसे सोपे नाही.

  संख्याबळाचा विचार करता संजय उपाध्याय यांच्यासाठी सुमारे ३० ते ३५ आघाडीची मते फोडण्यासाठी भाजप आग्रही राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजप बिनविरोध निवडणूक घेण्यास तयार होईल आणि संजय उपाध्याय यांना अर्ज मागे घेवून काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा करतील अशीच शक्यता आहे असे कॉंग्रेस मधील जाणकार सूत्रांचे मत आहे.