भाजपच्या विकासाच्या मुद्याला पूल दुर्घटनेचा बाधा; विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर द्यावे लागणार

निकृष्ट दर्जाच्या कामाच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘आप’ने आंदोलन केले. विकासाच्या नावाने लोकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत विरोधकांना लोकांच्या भावनांना हात घातला आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना ही पूल दुर्घटना घडल्याने भाजपचे काही नगरसेवकही चिंतेत सापडले आहेत.

    नागपूर (Nagpur) : निवडणूक लोकसभेची असो किंवा स्थानिक पातळीवरची भाजपकडून प्रखरपणे मांडला जाणारा शहर विकासाच्या मनसुब्याला पूर्व नागपुरातील खचलेल्या पुलाच्या घटनेमुळे जबर तडे गेले आहेत. महापालिको निवडणुकांच्या तोंडावर आता भाजपला विकासाच्या मुद्यावर होणाऱ्या टीकेलाही तोंड द्यावे लागणार आहे, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

    मागील १० वर्षांपासून भाजपकडून प्रत्येक निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रखरपणे मांडला जात आहे. त्यात नागपुरात झालेले उड्डाणपूल व रस्ते आणि इतर महाप्रकल्प यांचा प्रामुख्याने समावेश असतो. येथील खासदार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याच्या माध्यमातून झालेल्या कामांचे श्रेय भाजप घेत आली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधत असलेला कळमना-एचबी टाऊन उड्डाण पुलाचा भाग खचण्याची दुर्घटना या प्रचाराला मारक ठरण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हेतर आता संपूर्ण शहरभर होत असलेल्या उड्डाण पुलाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘आप’ने आंदोलन केले. विकासाच्या नावाने लोकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत विरोधकांना लोकांच्या भावनांना हात घातला आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना ही पूल दुर्घटना घडल्याने भाजपचे काही नगरसेवकही चिंतेत सापडले आहेत. शहरात सिमेंट रस्ते बनवण्यात आले. पण, त्यावर काही दिवसात जागोजागी भेगा पडल्या आहेत. त्याविरोधात जनमंचसारख्या स्वयंसेवी संघटनेने आवाज उठवला होता. त्याची दखल घेण्यात आली. कंत्राटदाराकडून कामे करवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. अजूनही रस्त्यांना भेगा पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते सिमेंटचे आणि चौकात सखल भाग आहे. मात्र, संबंधितांवर थातूरमातूर कारवाई करून तो विषय संपवण्यात आला.

    त्यावर जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी नापसंती व्यक्त के ली आहे.शहरातील सिमेंट रस्ते निकृष्ट दर्जाचे असले तरी कंत्राटदार किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विकासाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु ते करीत असताना लोक सुरक्षित राहतील. हे महत्त्वाचे आहे. त्यावर खर्चाचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. केवळ विकास- विकास करून कंत्राट, अधिकारी आणि सत्ताधारी यांचे खिसे भरण्याचा गोरखधंदा चालणार नाही. विकासात लोकांच्या जीवाला काही प्राधान्य आहे की नाही, असे जय जवान जय किसान संघटनेचे समन्वयक आणि सनदी लेखापाल विजयकुमार शिंदे म्हणाले.