मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवाल्यांना सरकारमध्ये घेतले आणि हे मेलेले जिवंत झालेत; आमदार आशिष जयस्वाल यांचे विवादित विधान

काँग्रेसवाल्यांनो! तुम्ही शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये येऊन शिवसेनेच्या लोकांना डिवचण्याचे काम करत आहात. आपण एका एकाला पुरून उरणार आहोत. तुम्ही शिवसेनेच्या गावात शिवसेनेच्या लोकांवर अन्याय करत आहात .......

  नागपूर (Nagpur) : हे काँग्रेसवाले मेले होते, यांना कोणी विचारत नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांना सरकारमध्ये घेतले आणि हे मेलेले लोक जिवंत झालेत, अशा वादग्रस्त शब्दात अपक्ष आमदार आणि शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal ) यांनी टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी पडणार का, याचीच चर्चा सुरु झाली आहे.

  महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेल्या सहकारी पक्ष काँग्रेसबद्दल वादग्रस्त मत व्यक्त करण्यात आल्याने नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक होत आहे. रामटेक तालुक्यातील मनसर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले. आता याचीच जोरदार चर्चा होत आहे. (Nagpur Zilla Parishad by-election)

  दोन्ही काँग्रेस पक्षामध्ये गळती लागली होती. यांचे लोक उड्या मारून दुसऱ्या पक्षात जात होते. कोणीही यांना विचारत नव्हते, आज हे मेलेले लोकं जिवंत झाले आहे, असे जयस्वाल म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण जे वक्तव्य करत आहोत या संदर्भात कोणाला भीत नाही, असे ठणकावून सांगितले. हे दर्शवण्यासाठी त्यांनी हो हे सर्व मी ओपनली सांगत आहे, सोशल मीडियावरुन सांगत आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.

  काँग्रेसवाल्यांनो! तुम्ही शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये येऊन शिवसेनेच्या लोकांना डिवचण्याचे काम करत आहात. आपण एका एकाला पुरून उरणार आहोत. तुम्ही शिवसेनेच्या गावात शिवसेनेच्या लोकांवर अन्याय करत आहात, हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

  हे भुरटे आहेत. त्यांना काय करायचे ते करू द्या. यांना कोणीही विचारत नाही. माझे सर्व पक्षांमध्ये वरपर्यंत संबंध आहेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून, हे कसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे, हे त्यांना सांगितले आहे, असे जयस्वाल म्हणाले.

  दरम्यान, नुकताच शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अन्याय करत असल्याची भाषा केली होती. असेच सुरू राहिल्यास त्याचे चांगले परिणाम होणार नाही, असेही राऊत म्हणाले होते.

  आता नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक होत असताना शिवसेनेचे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना धारेवर धरत त्यांच्याकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भाषा केली आहे. दरम्यान आशिष जयस्वाल यांनी सत्तेतील सहकारी पक्षांसंदर्भात जी भाषा वापरली आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील कलगीतुरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.