वस्त्रोद्योगासाठी मिळणारी वीज सवलत अन्य उद्योगांसाठी वापरली जाण्याची तक्रार

सध्या राज्यात नोंदणीकृत २६९ पैकी २६ सूत गिरण्या सुरू आहेत. नोंदणीकृत हातमागांची संख्या ३२ हजारांवर असून त्यापैकी २०६१ सुरू आहेत तसेच ३० हजार ४०० नोंदणी झालेल्या यंत्रमागांपैकी २७,४०० सुरू आहेत. राज्य शासनाच्या वस्रोद्योग धोरणानुसार या प्रकल्पांना वीज दरात सवलत जाहीर करण्यात आली आहे.

    नागपूर (Nagpur) : वस्त्रोद्योगासाठी शासनाकडून मिळणारी वीज सवलत अन्य उद्योगासाठी वापरली जात असल्याच्या तक्रारी आल्यावर सवलत घेणाऱ्या वस्रोद्योगांकडून सहा महिन्यांचे वीज देयक व प्रकल्पाचा एकूण वीज वापर याची माहिती मागवण्यात आली आहे.

    सध्या राज्यात नोंदणीकृत २६९ पैकी २६ सूत गिरण्या सुरू आहेत. नोंदणीकृत हातमागांची संख्या ३२ हजारांवर असून त्यापैकी २०६१ सुरू आहेत तसेच ३० हजार ४०० नोंदणी झालेल्या यंत्रमागांपैकी २७,४०० सुरू आहेत. राज्य शासनाच्या वस्रोद्योग धोरणानुसार या प्रकल्पांना वीज दरात सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी संबंधित प्रकल्पांना स्वयंघोषणापत्र द्यावे लागते. परंतु अनेक प्रकल्पांनी सांगूनही ते सादर केले नाहीत. वस्त्रोद्योगाच्या नावाखाली अन्य उद्योग वीज सवलतीचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या.

    दक्षता पथकाच्या तपासणीतही अनेक अनियमितता उघड झाल्या होत्या. शासनाच्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे दिसून आल्यावर शासनाने यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार वापरणाऱ्या यंत्रमागांना वगळून इतर सर्व वस्त्रोद्योगांना सहा महिन्यांचे वीज देयक तसेच एकूण वीज वापर याची माहिती सादर करण्यास सांगितली आहे, असे वस्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले.