गर्भवती पत्नी आणि पतीच्या दुचाकीला कंटेनरची धडक; पत्नीसह गर्भातील बाळाचा मृत्यू

    बुटीबोरी (जि. नागपूर) : दुचाकीवर पतीसोबत रुग्णालयात तपासणी करण्यासाठी जात असताना मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत गर्भवतीसह गर्भात असलेल्या बाळाचा करुण अंत झाला. ही हृदयद्रावक घटना राष्ट्रीय महामार्गावरील बोथली शिवारातील भारत पेट्रोल पंपसमोर घडली. अंकिता नीलेश कपले (२५, रा. सोगोला, जि. बुलढाणा, हल्ली मुक्काम एमआयडीसी कॉलोनी, प्रभाग ७, बुटीबोरी) असे गर्भातील बाळासह मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

    प्राप्त माहितीनुसार, नीलेश कपले (३३) हा एमआयडीसी कार्यालयात नोकरीला आहे. त्याचा एक वर्षांपूर्वी अंकितासोबत मोठ्या आनंदात विवाह झाला होता. अंकिता नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्यांची सुरुवातीचे काही महिने बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात तपासणी सुरू होती. काही कारणास्तव त्यांना पुढील तपासणीसाठी खापरी येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात जायचे होते.

    अंकिता पतीसोबत दुचाकीने दुपारी बारा वाजताच्या सुमारास रुग्णालयात जाण्यासाठी निघाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघेही राष्ट्रीय महामार्गावरील बोथली शिवारातील भारत पेट्रोल पंपनजीक पोहोचले. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव कंटेनर (क्र.एम एच ३४, एबी १८४५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात नीलेश बाजूला फेकला गेला, तर अंकिताला डोक्याला गंभीर दुखापत झाली.

    नीलेशने कसेबसे स्वतःला सावरत खासगी वाहनाच्या मदतीने अंकिताला घेऊन नागपूर येथील रुग्णालय इस्पितळ गाठले. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. डॉक्टरांनी अंकिता आणि गर्भातील बाळाला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला; मात्र चालक पसार झाला होता. माहिती लिहितोवर चालकास अटक झालेली नव्हती. पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोकाकुल वातावरण आहे.