नागपुरात संचारबंदी सुरू; विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

     नागपूर ( Nagpur).  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने 15 ते 21 मार्च दरम्यान कठोर संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे उपराजधानीत जागोजागी पोलिसांचा कठोर पहारा लावण्यात आला आहे. दरम्यान कोरोना अटींचे पालन न करणाऱ्या आणि विनाकारण रस्त्यावर हिंडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून थेट कारवाई करण्यात येत आहे.

    मानेवाडा चौक, तुकडोजी चौक आणि मेडिकल चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी विनाकारण हुज्जतबाजी घालणाऱ्या काही बाईस्वारांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसादही खावा लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करीत आहेत. सध्या तरी पोलीस लोकांवर सक्ती करी नसून समजावून सांगत आहेत.

    ओळख पत्र पाहून लोकांना सोडले जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. वस्त्यांमध्ये सुद्धा पोलीस गाड्यानी फिरून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आहेत.