नागपुरात नाल्यात आढळली मगर; धरमपेठ परिसरात खळबळ

अन्न, पाण्याच्या शोधात शहरालगतच्या वस्त्यांमध्ये बिबटे येण्याच्या घटना अलीकडच्या काळात नागपुरात बरेचदा घडल्या. शहराच्या सीमेपर्यंत वाघाचा वावर असल्याचे पुरावेही दिसले. आता मगरीचा वावर असल्याचे कळताच वनविभागाने शोधमोहीम सुरू केली.

    नागपूर (Nagpur) : अमरावती महामार्गावरील पत्रकार सहनिवासपासून वाहणाऱ्या नाग नदीच्या प्रवाहात मगरीचा मुक्काम असल्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाला मात्र अद्याप काहीही आढळलेले नाही.

    अन्न, पाण्याच्या शोधात शहरालगतच्या वस्त्यांमध्ये बिबटे येण्याच्या घटना अलीकडच्या काळात नागपुरात बरेचदा घडल्या. शहराच्या सीमेपर्यंत वाघाचा वावर असल्याचे पुरावेही दिसले. आता मगरीचा वावर असल्याचे कळताच वनविभागाने शोधमोहीम सुरू केली. मात्र अद्याप काहीही सुगावा लागला नसल्याची माहिती आहे. मगर पाण्यावर असल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता याठिकाणी बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

    शहराच्या मध्यभागी असलेल्या या भागात मगर आली असल्यास ती नेमकी कुठून आली, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही दुजोरा दिला. दहा ते बारा दिवसांपूर्वी पत्रकार कॉलनीजवळील नाल्यात मगर असल्याचे आम्हाला कळले होते. वनविभागाच्या चमूने त्या परिसरात तपास केला होता. मात्र, काहीही हाती लागले नव्हते. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या परिसरात मगर असल्याची बातमी आल्यावर पत्रकारांनी बातमीचा तपास केला. मात्र, मगरीचा ठावठिकाणा लागला नाही.

    स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घ्यावी काळजी!
    या नाल्यातून मगर बाहेर येण्याची शक्यता नसल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांनी बोलताना सांगितले. नाल्यात बाहेरून येणाऱ्या पाण्याबरोबर मगर वाहत आली असावी. नाल्यातील सिमेंटच्या बांधकामाच्या आड ती लपत असावी. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेहमी नाल्यात उतरतात. त्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना आम्ही महापालिकेला दिल्या आहेत, असेही हाडांनी सांगितले. वैनगंगा नदी किवा वेणा जलाशयाच्या प्रवाहातून मगर याठिकाणी आली असावी, अशी शक्यता वन्यजीवतज्ज्ञांनी वर्तविली.