बैल बुद्धी म्हंटले म्हणून मित्राची केली हत्या

आकाशने नशेत अरुणला बैल बुद्धी म्हटले. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास सर्व घरी जाण्यासाठी निघाले. फ्लॅटच्या खाली उतरल्यानंतर आकाश आणि अरुणमध्ये पुन्हा वाद सुरू झाला.

  नागपूर, दारूच्या नशेत (drunk) एका तरुणाने आपल्याच मित्रावर (Friend) चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वताच त्याला रुग्णालयातही घेऊन गेला. मात्र उपचारादरम्यान मित्राचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा (Murder) गुन्हा नोंदवून आरोपी तरुणाला अटक केली.

  आकाश ताराचंद गौंड (25) रा. श्रीनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर तुषार सुरेशसिंग ठाकूर (25) रा. दर्शन कॉलनी असे मृताचे नाव आहे.

  तुषार मनीषनगरच्या बिग बाजारात काम करीत होता. आकाशच्या वडिलांचा टाईल्सचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री तुषार आणि आकाशला दारू पार्टी करायची होती. त्यासाठी तुषारने अरुण उर्फ राम अवस्थी नावाच्या मित्राशी संपर्क केला.

  अरुणने व्यंकटेशनगरात राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर दारू पिण्याची व्यवस्था केली. रात्री 11 वाजतापर्यंत तुषार, अरुण, आकाश आणि तरुणीच्या प्रियकराने दारू ढोसली.

  बैल बुद्धी म्हटल्यावरून झाला वाद

  या दरम्यान मोबाईलवर एका बॅन्डचे गीत वाजले. त्याचा गायक कोण आहे यावरून वादीवाद सुरू झाला. आकाशने नशेत अरुणला बैल बुद्धी म्हटले. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास सर्व घरी जाण्यासाठी निघाले. फ्लॅटच्या खाली उतरल्यानंतर आकाश आणि अरुणमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. तुषारने मध्यस्थी करून वाद सोडवला. अरुण एमबीए असून एका खासगी कंपनीत काम करतो. आकाशने बैल बुद्धी म्हटल्याने तो दुखावला होता. सर्वांसमोर झालेल्या अपमानामुळे तो चिढलेला होता. रात्री 12 वाजताच्या सुमारास तुषार आणि अरुण पुन्हा आकाशला भेटायला त्याच्या घरी गेले. तुषारने आकाशला माफी मागण्यास सांगितले. यावरून आकाश आणि तुषारमध्ये वाद झाला. तुषारने त्याला मारण्याची धमकी दिली आणि इतर मित्रांना फोन लावू लागला.

  मोटारसायकलवर घेऊन गेले रुग्णालयात
  त्याच दरम्यान आकाशने चाकू आणून तुषारच्या छातीत तीनदा भोसकले. रागात त्याने तुषारला चाकू तर मारला, मात्र नंतर तो घाबरला. अरुणसोबत मिळून त्याने तुषारला मोटारसायकलवर बसवले आणि उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात घेऊन गेला. बुधवारी सकाळी तुषारचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

  पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले. त्याच्यावर यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आता फ्लॅटमध्ये उपस्थित इतर लोकांचे बयाण नोंदवित आहेत. घटनेमागे दुसरे काहीतरी कारण असल्याचा संशय आहे. या घटनेचा तुषारच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.