सोयाबीनचे दर गडगडल्याने शेतकरी चिंतेत; बाजारभाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४४०० वर

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kalmana Agricultural Produce Market Committee) १८ सप्टेंबर रोजी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ (Soybean procurement launching) झाला. साधारणपणे पहिल्या दिवशीच्या खरेदी व्यवहाराला मुहूर्ताचा बाजार असे म्हणतात. यादिवशी सोयाबीनचा दर (The price of soybean) प्रतिक्विंटल १०,१११ रुपये होता.

  नागपूर (Nagpur) : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kalmana Agricultural Produce Market Committee) १८ सप्टेंबर रोजी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ (Soybean procurement launching) झाला. साधारणपणे पहिल्या दिवशीच्या खरेदी व्यवहाराला मुहूर्ताचा बाजार असे म्हणतात. यादिवशी सोयाबीनचा दर (The price of soybean) प्रतिक्विंटल १०,१११ रुपये होता. पहिल्याच दिवशी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र, आठवड्याभरातच हा दर चार हजारांवर आला आहे. शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ४ हजार ते ४,४०० रुपयांदरम्यान आहे.

  सध्या सोयाबीनला हमीभाव प्रतिक्विंटल ३,९५० रुपये आहे. याबाबत अधिक सांगताना कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, ‘आठवड्याभराच्या आत दर पडला. पाऊस असाच सुरू राहिला तर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील. शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. गरज पडल्यास पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई करावी लागेल, असा अंदाज आहे.’

  कळमन्यात मदतनीस म्हणून कार्यरत रवींद्र मेंढे म्हणाले, ‘मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन अधिक आहे. परंतु, आलेल्या उत्पादनातील २५ ते ३० टक्के मालात ओलावा आहे. मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मार्केट डाउन सुरू आहे.’

  देशात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यातल्या त्यात विदर्भात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. अक्षरश: सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या पार्श्वभूमीवर सोयाबीनचा पडलेला दर शेतकऱ्याला निराशेच्या गर्तेत नेऊन ठेवणारा असून कृत्रिमरीत्या दरघट झाल्याची ओरड सुरू झाली आहे.

  सरकारी धोरणाचा फटका!
  सोयामील (पशुखाद्य) आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अचानक किंमती कमी झाल्या आहेत. त्या अजून पडण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयाला आडतियांनी विरोध दर्शविला आहे. यावेळी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनखालील क्षेत्र वाढवले होते. या कारणास्तव सोयाबीन बियाण्यांची मागणी लक्षणीय वाढली होती आणि किमती जवळपास दुप्पट झाल्या होत्या. आता कापणीपूर्वीच किंमतीत एवढी मोठी घसरण झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटते.