फायनांस कंपन्या वसुलीसाठी घेतात गुंडांची मदत

  • हफ्ते भरण्यासाठी ग्राहकांना दमदाटी

नागपूर.  अलिकडे कोणतीही वस्तू फायनान्सवर घेण्याचे फॅड आले आहे. दुचाकी, चारचाकी, घर आदींसह मोबाईल व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी खासगी फायनान्स कंपन्यांकडून सहजरित्या कर्ज उपलब्ध केले जाते. पूर्वी राष्ट्रीय, सहकारी बँका व पतपेढ्या आर्थिक पतपुरवठा करीत होत्या. मात्र, या बँकांच्या व पतपेढ्यांच्या जाचक अटींमुळे ग्राहक त्रासून जायचा. याचाच फायदा घेवून अनेक मोठ-मोठ्या गुंतवणूकधारकांनी खाजगी पतपुरवठा कंपन्या स्थापन करून ‘फायनान्स’ हा फंडा बाजारात आणला आहे. हजार रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत या फायनान्स कंपन्या ग्राहकांना वित्त पुरवठा करतात. ज्याची ऐपत नसेल, अशा लोकांनाही फायनान्स कंपन्यांनी भुरळ घातली आहे. ज्यांना राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पतपुरवठा नाकारला, अशांना फायनान्स कंपन्यांचा आधार मिळतो. एक चतुर्थांश रक्कम भरल्यानंतर बाकी राहिलेल्या रकमेचा पतपुरवठा संबंधित फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून केला जातो.

फायनान्स कंपन्याकडून संबंधित ग्राहकांकडून तारण म्हणून सही केलेले कोरे धनादेश, जमिनीचे सातबारे, जामीनदार व्यक्ती, आदी घेतले जातात. तसेच ज्या माणसाला इंग्रजी कळत नाही वा वाचताही येत नाही अशा व्यक्तींकडून इंग्रजी दस्तावेजावर सह्या घेतल्या जातात. या अगोदर या ग्राहकांचा विश्‍वास त्यांनी संपादन केलेला असतो. आपण नक्की कोणत्या कागदपत्रावर सही करतोय याची त्या व्यक्तीला कल्पनाही नसते. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा संबंधित फायनान्स कंपन्यांकडून घेतला जातो. आवळ्याच्या बदल्यात कोहळा ही म्हण वापरून त्या व्यक्तीच्या असहाय्यतेचा फायदा उचलून या कंपन्या स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत.

लोकांच्या अडचणींचा घेतात फायदा
या फायनान्स व विमा कंपन्यांवर आयआरडीए व सेबी (सिक्युरीटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) या केंद्र सरकारच्या देशातील भांडवल बाजारांचे नियंत्रण करणाऱ्या मध्यवर्ती यंत्रणा नियंत्रण ठेवून असतात. मात्र मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवणूकदारांकडून या फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवला जातो व संबंधित गुंतवणूकदारांना फायनान्स कंपन्या काळ्याचे पांढरे करून परतावा देत असल्यामुळे या फायनान्स कंपन्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. याच आधारावर फायनान्स देण्यासाठी फायनान्स कंपन्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे बँकांनी नाकारलेल्या अनेकांना खाजगी फायनान्स कंपन्यांचाच आधार वाटतो. एखादी वस्तू खरेदी करण्याआधी त्या वस्तूमध्ये ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या अडकलेली असते.

नेमक्या याच गोष्टीचा फायदा या कंपन्या उचलतात. प्रत्यक्षात सांगितलेला आणि लावलेला वेगळा व्याजदर यामुळे माणूस पुरता गांगरुन गेलेला असतो. परंतू वेगवेगळ्या नियम व अटी असणाऱ्या कागदपत्रांवर सह्या केल्या असल्यामुळे तो संबंधित कायद्याच्या कचाट्यात अडकलेला असतो. दगडाखाली हात सापडल्यानंतर भल्याभल्यांची मती गुंग होते, तद्वतच फायनान्स कंपन्यांचे तो काहीच करू शकत नाही.

वारंवार फोन करून देतात त्रास
आर्थिक व घरगुती कारणावरुन फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा एखादा हप्ता ग्राहक भरू शकत नाही, नेमके याच गोष्टीचा फायदा फायनान्स कंपन्याकडून उचलला जातो. चुकलेल्या हप्त्यासाठी इतके फोन केले जातात की समोरचा जेरीस येतो. इतकेच नाहीतर जामीनदार म्हणून असलेल्या व्यक्तींनाही फोन करून त्रास दिला जातो. त्यांना संबंधिताने कर्जाचे हफ्ते भरले नाही तर तुमच्यावर कारवाई करू म्हणून धमकावले जाते. यानंतर सुरू होतो तो फायनान्स कंपन्यांच्या अनाधिकृत गुंडांचा ससेमिरा. कोणतेही अधिकार नसताना फायनान्स कंपन्याकडून नियुक्त केलेल्या एजन्सीचे गुंड थकीत कर्ज वसुलीसाठी थेट ग्राहकांचे घर गाठतात. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी त्यांना धमकावले जाते.

जबरीने करतात वाहन जप्त
शहरातील अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी नामचीन गुन्हेगारांना वसुलीच्या एजन्सी दिलेल्या आहेत. याला कोणतीही बँक अथवा फायनान्स क्षेत्रातील तसेच मध्यवर्ती संस्थेची परवानगी नसतानाही संबंधित फायनान्स कंपन्यांच्या शाखा व्यवस्थापनाने अशा गुंडापुंडांना वसुलीच्या एजन्सी दिल्या आहेत. या एजन्सीमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांचा भरणा केलेला दिसून येत आहे. हे युवक प्रत्येक चौका-चौकात कागदाचे भेंडोळे घेवून उभे असलेले दिसून येतात. या कागदाच्या भेंडोळ्यांवर कर्जधारकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि दुचाकी व चारचाकी वाहनांच्या क्रमांकाचा भरणा असतो. एखाद्या गाडीचे एक-दोन हप्ते थकले तरी संबंधितांकडून कोणताही मुलाहिजा न बाळगता संबंधित गाडी अडवून वाहन चालकाला शिवीगाळ व प्रसंगी मारहाण करुन कायदा हातात घेतला जातो.

यावेळी संबंधिताकडे त्या फायनान्स कंपनीचे साधे ओळखपत्रही नसते. त्यामुळे संबंधित गाडी चालकाला समोरच्याची ओळख पटविणे कठीण होवून बसते. अशावेळी गाडी ताब्यात द्या. अन्यथा बाकी असलेल्या कर्जाच्या हप्त्यासह आमचीही फी द्यावी लागेल, अशी दटावणी केली जाते. परंतू हप्त्यावरील व्याज व संबंधित एजन्सीच्या गुंडांनी मागितलेली रक्कम अव्वाच्या सव्वा असते. त्यामुळे संबंधित वाहनचालक हतबल होतो. याच गोष्टीचा फायदा फायनान्स कंपनीचे गुंड उचलतात. भर रस्त्यात वाहनचालकासह त्याच्या कुटूंबाला गाडीतून उतरवले जाते व गाडी ताब्यात घेतात. परंतू त्या चालकाला पुन्हा कधीच ती गाडी परत दिली जात नाही. म्हणजेच गाडीही गेली आणि आतापर्यंत भरलेले पैसेही गेले, अशी अवस्था सध्या फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची केली जात आहे. वास्तविक हे सर्व बेकायदेशीर आहे. ही एकप्रकारे अवैध खासगी सावकारीच आहे. फायनान्स या गोंडस नावाखाली नागरिकांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिस यंत्रणाही जास्त लक्ष घालत नसल्यामुळे या फायनान्स कंपन्या व त्यांनी पोसलेल्या गुंडांचे फावलेले आहे.