आरोग्य भरती पेपरफुटीचा औरंगाबादशी संबंध असल्याचा संशय; एमपीएससी समन्वय समितीकडून पोलिसात तक्रार

विद्यार्थी संघटनेच्या आरोपानुसार, परीक्षेच्या दोन दिवसांआधीच परीक्षेशी संबंधित आवश्यक साहित्य घेऊन जातानाची एक चित्रफित समोर आली. यामध्ये परीक्षेचे साहित्य हे खासगी वाहनातून नेत असताना दिसून येते. रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा होती. मात्र, या परीक्षेचा पेपर व्हॉट्सअॅिपवर परीक्षेआधीच व्हायरल झाला. याच पेपरची उत्तरेही सकाळी ८.३३ वाजता व्हॉट्अॅेपवर पाठवण्यात आल्याचे एका स्क्रिन शॉटवरून उघड झाले.

    नागपूर (Nagpur) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रविवार ३१ ऑक्टोबरला झालेल्या वर्ग ‘ड’च्या दुपारच्या सत्रातील परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा परीक्षा नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविरोधात एमपीएससी समन्वय समितीने पोलिसात तक्रार दिली असून औरंगाबाद येथून परीक्षेआधीच पेपर फुटल्याचा संशय प्राथमिक तपासातून व्यक्त केला जात आहे.

    आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा नियोजनाच्या गोंधळाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापले. त्यामुळे आरोग्य विभागाने परीक्षा घेणाऱ्या ‘न्यास कम्युनिकेशन प्रा. लि.’ ला यासंदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजावली. ३१ ऑक्टोबरच्या वर्ग ‘ड’च्या परीक्षेदरम्यान तरी पुन्हा चुका होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, याही परीक्षेचा पेपर फुटल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भात एमपीएससी समन्वय समितीने पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस विभागाने याचा तपास सुरू केला असून औरंगाबाद येथून पेपर फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील या गोंधळामुळे सरकारने परीक्षाच रद्द करावी व सक्षम यंत्रणेकडून नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

    घटनाक्रम…
    विद्यार्थी संघटनेच्या आरोपानुसार, परीक्षेच्या दोन दिवसांआधीच परीक्षेशी संबंधित आवश्यक साहित्य घेऊन जातानाची एक चित्रफित समोर आली. यामध्ये परीक्षेचे साहित्य हे खासगी वाहनातून नेत असताना दिसून येते. रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा होती. मात्र, या परीक्षेचा पेपर व्हॉट्सअॅिपवर परीक्षेआधीच व्हायरल झाला. याच पेपरची उत्तरेही सकाळी ८.३३ वाजता व्हॉट्अॅेपवर पाठवण्यात आल्याचे एका स्क्रिन शॉटवरून उघड झाले. त्यामुळे पेपर फुटल्याचा दाट संशयावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    परीक्षेआधीच पेपर फुटल्याचे आम्ही समोर आणले होते. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि पुणे सायबर पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हे नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे. पेपर फुटल्यामुळे सरकारने आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड वर्गाच्या परीक्षा रद्द कराव्या, अन्यथा येत्या काळात आम्ही आंदोलन करू.
    राहुल कवठेकर, अध्यक्ष, एमपीएससी समन्वय समिती.