पत्नीच्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा; अल्पवयीन प्रियकराला दिली हत्येची सुपारी

प्रदीप बागडे आणि त्यांची पत्नी सीमा बागडे यांच्यात वारंवार वाद होत होते. सीमा आणि पवन चौधरी यांच्यात मैत्रीपूर्व संबंध जुळले. यानंतर सीमाने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

    नागपूर (Nagpur) : नागपुरातील प्रॉपर्टी डीलर असलेल्या प्रदीप बागडे (Pradeep Bagade) यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप बागडे यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी (Wife hire contract killer to murder husband) दिल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) प्रदीप बागडेंची पत्नी सीमा आणि तिचा मित्र पवन या दोघांनाही अटक केली आहे.

    काय आहे संपूर्ण प्रकरण?
    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रदीप बागडे हे प्रॉपर्टी डीलर होते. बागडे यांच्या एका प्लॉटवर पवन चौधरी हा चायनिजचा व्यवसाय करत होता. तसेच बागडेंच्या येथे कारवॉशिंगचाही व्यवसाय करत होता. प्रदीप बागडे आणि त्यांची पत्नी सीमा बागडे यांच्यात वारंवार वाद होत होते. सीमा आणि पवन चौधरी यांच्यात मैत्रीपूर्व संबंध जुळले. यानंतर सीमाने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

    सीमाने पवन चौधरी याला पतीच्या हत्येची सुपारी दिली. 3 लाख रुपयांत हा सौदा ठरला आणि त्यानंतर पवन चौधरी याने प्रदीप बागडे यांचे कारमधून अपहरण करुन हत्या केली. यानंतर त्यांचा मृतदेह हा सावनेर तालुक्यात खापा पोलीस ठाण्याअंतर्गत जंगलात फेकून दिला. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर पवन चौधरी याला चौकशीसाठी ताब्यत घेतले.

    पोलिसांच्या चौकशीत पवन याने जमीनीच्या वादातून हत्या केलंयाचं सांगितलं. मात्र, पोलिसांना संशय असल्याने त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता पवनने घडलेला प्रकार सांगितला. हत्येची सुपारी देण्याचं उघड होताच पोलिसांनी प्रदीप यांची पत्नी सीमा हिला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या हत्या प्रकरणात पवन चौधरी याला त्याच्या एका मित्राने मदत केली असल्याचीही माहिती समोर येत आहे.