नागपूरात काँग्रेसने दिली RSS च्या स्वयंसेवकाला विधान परिषदेची उमेदवारी

भोयर यांनी रविवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व सोमवारी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. छोटू भोयर यांचे संपूर्ण कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले आहे. वडील दिवंगत डॉ. प्रभाकर भोयर हे १९४९ ते १९५६ या काळात संघाचे प्रचारक होते. १९८५ ते १९९५ या काळात नागपूर ग्रामीणचे संघचालक म्हणून तर १९९८ ते २०१० पर्यंत रेशीमबाग भागाचे संघचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या आई दिवंगत ताराबाई जनसंघाच्या कार्यकर्त्यां होत्या. १९९२ मध्ये त्या भाजपच्या नगरसेविका होत्या.

    नागपूर – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी 10 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक आता अतिशय रोमांचक बनली आहे. कारण काँग्रेसने आता नागपुरात संघ स्वयंसेवक, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर विश्वस्त डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली आहे. छोटू भोयर यांनी अधिकृतपणे भाजपला राम-राम ठोकला. त्यानंतर त्यांनी आता आपण राजकीय कारकिर्दीच्या शेवटपर्यंत काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

    छोटू भोयर आज मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्या वतीने सोमवारी सर्वप्रथम कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. कोल्हापूरमधून सतेज पाटील यांना तर धुळे नंदूरबारमधून गौरव देवेंद्रलाल वाणी यांना पक्षाने उमेदवारी दिली. हे दोन उमेदवार जाहीर केले असताना काँग्रेसने नागपूरच्या उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले होते.

    भोयर यांनी रविवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व सोमवारी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. छोटू भोयर यांचे संपूर्ण कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले आहे. वडील दिवंगत डॉ. प्रभाकर भोयर हे १९४९ ते १९५६ या काळात संघाचे प्रचारक होते. १९८५ ते १९९५ या काळात नागपूर ग्रामीणचे संघचालक म्हणून तर १९९८ ते २०१० पर्यंत रेशीमबाग भागाचे संघचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या आई दिवंगत ताराबाई जनसंघाच्या कार्यकर्त्यां होत्या. १९९२ मध्ये त्या भाजपच्या नगरसेविका होत्या.

    नागपूरमध्ये भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली असून भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या भोयर यांच्याशीच बावनकुळे यांना लढत द्यावी लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे.