खासदार कृपाल तुमानेंची सोशल मीडिया अकाऊंटस हॅक; टर्किश आर्मीचा उल्लेख

    नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची सकाळी माहिती पुढे आली. टर्किश सेक्युरिटी आर्मी नावाचा उल्लेख त्यात दिसून येत आहे. नागपूर सायबर सेल कडे खासदार तुमाने यांनी तक्रार दाखल केली.

    खासदारांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्यानं खळबळ
    सोशल मीडियावर सामान्य जनतेची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता थेट खासदाराचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. खासदार कृपाल तुमाने यांचं फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानं सायबर सेल कामाला लागला आहे.

    कोण आहेत कृपाल तुमाने?
    कृपाल तुमाने यांचा जन्म 1 जून 1965 रोजी नागपुरात झाला. नागपुरात त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या कृपात तुमाने यांनी सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम केले. त्यानंतर कृपाल तुमाने यांनी राजकारणात प्रवेश केला. इतक्या वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतरही कृपाल तुमाने आजही तळागाळातील नागरिकांशी संपर्कात आहेत. हाच दांडगा जनसंपर्क कृपाल तुमाने यांची जमेची बाजू मानली जाते. याशिवाय, जनमानसात त्यांचा स्वत:चा असा एक वैयक्तिक करिष्माही आहे.