सामूहिक बलात्कार प्रकरणात नागपूर पोलिसांची भूमिका संशयास्पद!

सायंकाळी 6.30 वाजता पीडित मुलगी चुलत बहिणीसोबत अजनी पोलिस ठाण्यात पोहचली. मात्र अजनी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली.

    नागपूर. अजनीतील गुंड दत्तू खाटक आणि त्याच्या तीन साथीदारांनी एका 15 वर्षीय मुलीवर सामूिहक अत्याचार केला. या प्रकरणातील चारही आरोपींना अजनी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अटकेतील आरोपींमध्ये विशाल ऊर्फ दत्तू खाटक, अमित लोखंडे (22, रा. कैलासनगर), प्रशिक गोटे (25) आणि बिट्टू वाघमारेचा समावेश आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुलर चौकात राहणारी 15 वर्षीय पीडितेची चुलत बहीण बाबुलखेडाच्या वसंतनगरात भाड्याने खोली करून एकटीच राहते. तिच्या मैत्रीणीशी पीडितेची ओळख झाली. ती मैत्रीण आरोपी अमित लोखंडेची प्रेयसी आहे. तिच्यावर अमितची नजर होती.

    अमितने पीडितेची ओळख सराईत गुंड दत्तू खाटकशी करून दिली. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमितवर दबाव टाकला. त्यामुळे अमितने आपल्या प्रेयसीच्या मदतीने कट रचून पीडितेला भेटायला आणण्यास सांगितले. मंगळवारी रात्री दत्तू, प्रशिक, अमित आणि बिट्टू यांनी त्या मुलीला एका पडक्या घरात नेले. तिच्या मानेवर चाकू लावला आणि चौघांनी सामूहिक बलात्कार केला. एकाने बलात्काराचा व्हिडिओ आणि फोटो काढले. पोलिसात गेल्यास सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

    पोलिसांच्या भूमिकेवर संशय !
    सायंकाळी 6.30 वाजता पीडित मुलगी चुलत बहिणीसोबत अजनी पोलिस ठाण्यात पोहचली. मात्र अजनी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. तर तोतया सामाजिक कार्यकर्ता महिलेने पीडित मुलीवर दबाव टाकून तक्रार न देण्यासाठी दमदाटी केली. त्यानंतर अजनीतील एका अधिकाऱ्यासोबत कारमध्ये बसून ‘सेटींग’ केल्याची चर्चा होती.