नागपूरकरांची पाणीकपातीची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो

उन्हाळ्यात नागपूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कधीकधी पाणीपुरवठादेखील खंडित करावा लागतो. मात्र सध्या तोतलाडोह आणि नवेगाव खैरी (Totladoh and Navegaon Khairi dams) ही दोन्ही धरणे भरली आहेत.

  नागपूर (Nagpur) : नागपूर शहराची वर्षभराची पाण्याची चिंता (water crisis) आता मिटली आहे. कारण नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह (Totladoh) आणि नवेगाव खैरी (Navegaon Khairi) ही दोन्ही धरणे भरली आहेत. दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता नागपूरकरांना वर्षभरासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. तसेच शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

  पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे भरली
  उन्हाळ्यात नागपूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कधीकधी पाणीपुरवठादेखील खंडित करावा लागतो. मात्र सध्या तोतलाडोह आणि नवेगाव खैरी (Totladoh and Navegaon Khairi dams) ही दोन्ही धरणे भरली आहेत. मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या पेंच नदीवरील तोतलाडोह धरणातून नागपूर शहराला 70 टक्के पाणीपुरवठा केला जातो. तर उर्वरित 30 टक्के पाणीपुरवठा नवेगाव खैरी धरणातून होतो. सध्या मध्यप्रदेश आणि नागपूरमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.

  चांगला पाऊस झाल्यामुळे तूट भरून निघाली
  ऑगस्ट महिन्याच्या शेवटी नागपूरमध्ये पावसाची तूट चार टक्के होती. मात्र सप्टेंबरच्या मध्यात नागपूरमध्ये चांगला पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्यामुळे तूट भरून निघाली आहे. शिवाय चांगला पाणीसाठादेखील झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. नागपूरला पुढील वर्षभर पाणीपुरवठा सुरळीतपणे करता येणार आहे.

  पाणी योग्य पद्धतीने वापरण्याचे आवाहन
  दरम्यान, नागपूरला पाणी पुरवणारी दोन्ही धरणे भरली असली तरी भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पिण्याचे पाणी योग्य पद्धतीने वापरण्याचे आवाहन ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी केलं आहे. तसेच सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा आसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणे टाळायला हवे, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.