पोलिसांच्या नाकावर निंबू टिचून २० लाखाची घरफोडी, पोलीस साखरझोपेतच

अजनी भागात घरफोडींचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉक्टरकडे धाडसी घरफोडी करून २८ तोळे सोन्याचे दागिने व रोख लंपास केली.

    नागपूर (Nagpur) : अजनी भागात घरफोडींचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉक्टरकडे धाडसी घरफोडी करून २८ तोळे सोन्याचे दागिने व रोख लंपास केली. ही घटना वंजारीनगरमधील एमआयजी क्वॉर्टर येथील डॉ. ज्ञानेश्वर शंकरराव इंगळे (वय ६८) यांच्याकडे उघडकीस आली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. ज्ञानेश्वर यांच्या पत्नी मालती या निवृत्त प्राध्यापिका आहेत. ज्ञानेश्वर हे १० नोव्हेंबरला कामानिमित्त जोधपूर येथे गेले. १७ नोव्हेंबरला त्यांच्या पत्नी स्टुलावरून खाली पडल्याने जखमी झाल्या. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान संधी साधून चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडले. आलमारीतील सोन्याचे दागिने, रोख व लॅपटॉपसह सहा लाखांपेक्षा अधिकचे साहित्य चोरी केले.

    याप्रकरणी अजनी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या डॉक्टरकडे घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह २० लाखांचा ऐवज चोरी केला होता. वंजारीनगर परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.