लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी एसटीला मोठा शॉक, बस स्थानकावर शुकशुकाट; इतक्या लाखांचं नुकसान

प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दररोज १ लाख ४० हजार किलोमीटर फेऱ्या बस करतात. परंतु, लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी पाठ फिरविल्यामुळे ८० हजार किलोमीटर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

    नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दिवसागणिक कोरोना हातपाय पसरत आहे. नागपुरमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं असून लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे एसटी महामंडळाला २७ लाखांचा फटका बसला आहे.

    प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दररोज १ लाख ४० हजार किलोमीटर फेऱ्या बस करतात. परंतु, लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी पाठ फिरविल्यामुळे ८० हजार किलोमीटर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

    विभागात केवळ ६० हजार किलोमीटर बस धावल्या. एरवी दररोज विभागाला ४२ लाख रुपये उत्पन्न होते. परंतु, ८० हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्यामुळे सोमवारी विभागाला केवळ १५ लाख रुपये उत्पन्नावर समाधान मानावे लागले. त्यामुळे विभागाचे २७ लाखांचे नुकसान झाले आहे.