२ मुलांच्या आईसमोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव, नकार मिळाल्यानंतर केला ‘हा’ गुन्हा

पीडित विवाहिता आणि आरोपी दोघंही एकेकाळी शाळकरी वर्गमित्र असल्याने महिलेनं विश्वासानं त्याच्याशी संवाद साधला. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या घटनेनंतर आरोपीचं पीडितेच्या घरी येणं-जाणं वाढलं.

    नागपूर (Nagpur) : नागपुरातील (Nagpur) कपिलनगर परिसरात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून (Crime in One sided love) एका महिलेला थेट स्वयंपाकघरात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, दोघंही विवाहित असून दोघांना प्रत्येकी दोन मुलं आहेत. असं असूनही संशयित आरोपीने पीडित महिलेला लग्नासाठी मागणी घालत तिला तिच्याच स्वयंपाकघरात डांबून ठेवलं (Married woman detain in kitchen) आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    मोनू आडकिणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो नागपुरातील पडोळेनगर परिसरातील जयभीक चौक येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. तो महापालिकेत कचरा संकलन आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतो. तर पीडित महिलाही विवाहित असून तिलाही दोन लेकरं आहेत.

    एकेदिवशी पीडित महिला पतीची तब्येत बिघडल्यानंतर घाईघाईने रुग्णालयाकडे जात होत्या. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला कचरा गोळा कऱणाऱ्या मोनूचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यामुळे त्याने तिला थांबवून विचारपूस केली. पीडित विवाहिता आणि आरोपी दोघंही एकेकाळी शाळकरी वर्गमित्र असल्याने महिलेनं विश्वासानं त्याच्याशी संवाद साधला. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या घटनेनंतर आरोपीचं पीडितेच्या घरी येणं-जाणं वाढलं.

    सुरुवातीला पीडितेला यात काही वावगं वाटलं नाही. पण काही दिवसांतच आरोपी पीडितेवर एकतर्फी प्रेम करू लागला. एकेदिवशी आरोपीनं पीडितेला तिच्या मुलांसमोरच लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण पीडितेनं याला साफ नकार दिला. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं पीडितेला तिच्याच घरातील किचनमध्ये डांबून ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली आहे. तसेच आरोपीला अटक केलं आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.