दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवतात, ठाकरे गटाच्या नेत्याने केली ही मागणी

रिया चक्रवतीनेच एयूचा खुलासा केला आहे. त्यामुळे कांगावा करणाऱ्यांचं कानफाड फुटलं आहे. अशा लोकांना मी कवडीची किंमत देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.

    नागपूर:  दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असलेल्या महिलेला युवासेनेकडून बळ दिलं जात असल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला आहे. शेवाळे यांच्या या आरोपावर ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवत आहेत. त्यामुळे शेवाळे यांची अटक करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

    भास्कर जाधव यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. सरकारमध्ये ताळमेळ नाही. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत. हे सरकार म्हणजे बोलाचा भात अन् बोलाचीच कढी आहे. भाजप सारखे निर्लज्ज लोक पाहिले नाहीत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

    रिया चक्रवतीनेच एयूचा खुलासा केला आहे. त्यामुळे कांगावा करणाऱ्यांचं कानफाड फुटलं आहे. अशा लोकांना मी कवडीची किंमत देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. राणेंची राज्यसभेची टर्म संपत आलीय का हे बघावं लागेल. राणेंचं कर्तृत्व शून्य आहे. कुणाला तरी खूश करण्याकरिता राणे पूर्वीच्या नेत्यांवर टीका करतात. त्या पक्षात जायचं आणि पदं मिळवायचं ही त्यांची खासियत आहे.

    त्यांना काहीच किंमत नाही. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे घराण्यावर टीका करत असतात. टीका केल्याशिवाय कोणी किंमत देणार नाही, महत्त्व देणार नाही हे त्यांना माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली. एक काळ होता. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नव्हता. पण आज सकाळ संध्याकाळ महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत आहे. पर्यायाने गुडघे टेकत आहे. हे चित्रं स्पष्ट झालं आहे. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान करूनही केंद्र सरकार त्यांना हटवत नाही. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान करावा, महाराष्ट्राचा अपमान करावा ही रणनीती दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.