Risk of 'Black Thrips' disease on chilli crop

मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील मिरची उत्पादकांचे 3000 कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्लॅक थ्रिप्स आजारामुळे उभे पीक उद्ध्वस्त होत आहे. एका-एका फुलावर 100-100 कीडे दिसून येत आहे. या किड्यांवर कीटनाशकही निष्प्रभ ठरत आहे.

  नागपूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मिरची पिकावर ‘ब्लॅक थ्रिप्स’चे संकट ओढवले आहे. यामुळे मिरची पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या असून त्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे(Risk of ‘Black Thrips’ disease on chilli crop).

  मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणातील मिरची उत्पादकांचे 3000 कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्लॅक थ्रिप्स आजारामुळे उभे पीक उद्ध्वस्त होत आहे. एका-एका फुलावर 100-100 कीडे दिसून येत आहे. या किड्यांवर कीटनाशकही निष्प्रभ ठरत आहे.

  एक लाख हेक्टरमध्ये उत्पादन

  राज्यात जवळपास 1 लाख हेक्टरमध्ये लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वे नागपूर, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूरमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले जाते. या भागातही मिरचीवर थ्रिप्सचा प्रकोप दिसून येत आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्रात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

  विदर्भात 8-10 लाख पोते उत्पादन

  तज्ज्ञांच्या मते, विदर्भात राजुरा, बुलडाणा, सिरोंचा, मांढळ आदी भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतात. या भागातून 8 ते 10 लाख पोते मिरचीची आवक होते. हजारो एकरमध्ये मिरची पीकाची लागवड केली जाते. सुदैवाने आजमितीस विदर्भातील मिरची पिकावर ब्लॅक थ्रिप्सचा प्रकोप दिसून आलेला नाही. काही भागात अंशता पिकांचे नुकसान झाले आहे, यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  किलोमागे 40 रुपयांची वाढ

  आंध्रप्रेदश आणि तेलंगाणात मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा प्रकोप पहायला मिळत आहे. दोन्ही राज्य मिरची उत्पादनात अग्रणी आहेत. मिरची उत्पादन कमी होण्याची शक्यता असतानाच मिरचीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एक महिन्याच्या आत लाल मिरचीच्या किमतीत 40 रुपयांची तेजी नोंदविली गेली. तेजा मिर्ची महिनाभरापूर्वी 130 रुपये किलो विकल्या जात होती, ती आज 170 रुपयांवर पोहोचली आहे. भविष्यात मिरचीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  कळमना सर्वात मोठी बाजारपेठ

  मिरची व्यापारी संजय वाधवानी यांच्या मते, लाल मिरचीसाठी कळमना बाजारपेठ भारतातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. दरवर्षी या बाजारपेठेत 6 ते 7 लाख बोरी लाल मिरचीची आवक होते. हंगामाच्या तोंडावरच मिरचीवर ब्लॅक थ्रिप्सने आक्रमण केल्यामुळे मिरचीची आवक कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे.

  पिक कापून फेकण्याची वेळ

  मिरचीवर ब्लॅक थ्रिप्सच्या आक्रमणामुळे संपूर्ण पीक कापून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हजारो शेतकऱ्यांचे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत कोणताही कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाही.