नागपुरात अल्पवयीन मुलांना दारुची विक्री; खुद्द पोलिस उपायुक्तांची कारवाई

जगनाडे चौक व सेंट्रल एव्हेन्यूवरील देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानांची पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी शनिवारी झाडाझडती घेतली. या तपासणी मोहिमेदरम्यान एका दुकानातून अल्पवयीन मुलांना दारूविक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले.

    नागपूर (Nagpur) : जगनाडे चौक व सेंट्रल एव्हेन्यूवरील देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दुकानांची पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी शनिवारी झाडाझडती घेतली. या तपासणी मोहिमेदरम्यान एका दुकानातून अल्पवयीन मुलांना दारूविक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दुकानमालकासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

    दुकान मालक पी. सी. दळवे व अन्य तिघे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या मोहिमेदरम्यान अतिक्रमण करून थाटण्यात आलेल्या दारू दुकानाचेही अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या मदतीने तोडण्यात आले. ही इमारत प्रिन्स मारवाह यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणात पोलिसांनी राजेश शेंडे व ईश्वर जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. अल्पवयीन मुलांना दारूविक्री केल्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्याची शिफारस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली आहे. दुकानादारांनी विनापरवाना दारूची विक्री करू नये, तसे आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती राजमाने यांनी दिली.

    राजमाने यांच्या कारवाईचा धसका अनेक दारूविक्रेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे हे दुकानदार मद्यपींना एक दिवसाचा दारू बाळगण्याचा परवाना उपलब्ध करून देत आहेत.