शिळ्या, बुरशीयुक्त मिष्ठांन्नांची विक्री; ‘या’ ११ रेस्टारेंटचालकांवर अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई

मिठाईमध्ये बुरशी आढळल्याची उदारहणेही आढळल्याने 'एफएसएसएआय'ने हा विषय गांभीर्याने घेतला. पेढे, बर्फी, गुलाबजामुन असे खाद्यपदार्थ केव्हा बनविले आणि केव्हापर्यंत चांगले राहतील, याची तारीख ट्रेवर नमूद न करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६नुसार कारवाई करण्यात आली.

  नागपूर (Nagpur) : ‘बेस्ट बीफोर’ची (Best Before date) तारीख न टाकता शहरातील अनेक विक्रेते (vendors) शिळ्या मिठाईची विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने (The Food and Drug Administration) शहरातील अशा ११ रेस्टॉरंट्सवर (restaurants) कारवाई केली.

  सणांच्या काळातील आपला आनंद द्विगुणित करण्याचे काम मिठाई करीत असते. हीच मिठाई देवापुढे ठेवली की तिचे रूपांतर प्रसादात होते. मोठ्या भक्तीभावाने हा प्रसाद आपण ग्रहण करीत असतो. मात्र, हा प्रसाद खरंच ताजा आहे का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

  रेस्टॉरंट, स्वीट मार्टमधील ट्रेमध्ये ठेवलेल्या गोड पदार्थांची विक्री करताना ते केव्हा बनविण्यात आले आणि केव्हापर्यंत चांगले राहू शकतील, या तारखांची नोंद करणे अनिवार्य असल्याचा निर्णय भारतीय खाद्य अन्न प्राधिकरणने (एफएसएसएआय) दिला होता. १ ऑक्टोबर २०२०पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक रेस्टॉरंटचालक याचे पालन करत नसल्याचे पुढे आले. मिठाईमध्ये बुरशी आढळल्याची उदारहणेही आढळल्याने ‘एफएसएसएआय’ने हा विषय गांभीर्याने घेतला. पेढे, बर्फी, गुलाबजामुन असे खाद्यपदार्थ केव्हा बनविले आणि केव्हापर्यंत चांगले राहतील, याची तारीख ट्रेवर नमूद न करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६नुसार कारवाई करण्यात येते.

  सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून ५५ रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सात नमुने घेण्यात आले. ११ रेस्टॉरंट्सनी नियमांचे उल्लंघन केल्याचे पुढे आले. अशा सहा रेस्टॉरंट्सकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच प्रकरणे न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत. ही कारवाईची मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ‘एफडीए’चे सहआयुक्त (अन्न) नागपूर जयंत वाणे यांनी सांगितले.

  यांना बसला दणका : 
  1) न्यू पकोडेवाला, डेली नीड्स अँड बेकरी : पाच हजारांचा दंड

  2) संतोष पकोडेवाला अँड चाट सेंटर, सीताबर्डी : न्यायनिर्णय अधिकाऱ्याकडे

  3) क्रिम कॉर्नर, रामदासपेठ : पाच हजारांचा दंड

  4) सागर स्नॅक्स ज्यूस अँड स्वीट सेंटर : न्यायनिर्णय अधिकाऱ्याकडे

  5) ओमसाई स्वीट अँड फरसाण, वाडी : न्यायनिर्णय अधिकाऱ्याकडे

  6) राज स्वीट मार्ट, सोमलवाडा : न्यायनिर्णय अधिकाऱ्याकडे

  7) गायत्री रेस्टॉरंट, हिंगणा मार्ग : पाच हजारांचा दंड

  8) अंबिका स्वीट मार्ट, गोकुळपेठ : चार हजारांचा दंड

  9) राज भंडार, धरमपेठ : पाच हजारांचा दंड

  10) अजय रेस्टॉरंट, गोकुळपेठ : दोन हजारांचा दंड

  11) न्यू लक्ष्मी स्वीट भंडार, गोकुळपेठ : न्यायनिर्णय अधिकाऱ्याकडे