एसटी कामगारांचा संप; खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची लूट

गावखेड्यातील प्रवाशांनी नागपुरात येण्यासाठी तर नागपुरातून जिल्ह्यामुख्यालयी जाण्यासाठी आर्थीक फटका सहन करावा लागत आहे. नागपूर ते भंडारा ९५ रुपये तिकिट आहे. मात्र २०० रुपये खासगी वाहतुकदार वसुल करीत आहेत.

    नागपूर (Nagpur) : राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला होता. मात्र आता एसटी कामगारांचा संप चिघळला असून संघटनांच्या हातून नियंत्रण सुटले आहे. मात्र, याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना होत आहे. या संपाचा फायदा खासगी कॅब, ट्रॅव्हल्सवाले घेत असून सर्वसामान्य प्रवाशंची लूट त्यांनी सुरू केली आहे.विशेष असे की, दोन दिवसात नागपूर विभागाला एसटीच्या १ कोटीच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे.

    एसटीची चाके थांबली. सोमवारी एकही फेरी झाली नाही. चक्क ९६८ बसफेऱ्या थांबल्या. यामुळे गावखेड्यातील प्रवाशांनी नागपुरात येण्यासाठी तर नागपुरातून जिल्ह्यामुख्यालयी जाण्यासाठी आर्थीक फटका सहन करावा लागत आहे. नागपूर ते भंडारा ९५ रुपये तिकिट आहे. मात्र २०० रुपये खासगी वाहतुकदार वसुल करीत आहेत. अमरावती, चंद्रपूरसाठी तर दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. पुण्यासाठी तर नागपुरातून तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. खासगी वाहतुकदारांकडून सुरू असलेल्या लुटीमुळे गरीबाचे दिवाळीच्या काळातच दिवाळे निघत आहे.

    ‘आरटीओ’ची बघ्यांची भूमिका
    खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट होत आहे. हा प्रकार नियमबाह्य आहे. मात्र आरटीओकडून नियमबाह्य भाडे आकारणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून सर्व सामान्यांच्या खिशाला झळ पोहचत असतानाही केवळ बघ्याची भूमिका वठवित असल्याच्या संतप्त भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या.

    नागपूर ते अमरावती —- ५०० रूपये

    नागपूर ते यवतमाळ —- ३०० रूपये

    नागपूर ते भंडारा —- २००रूपये

    नागपूर ते चंद्रपूर —- ४०० रुपये

    नागपूर ते पूणे —- ३ हजार