निकृष्ठ आणि मातीमिश्रित कोळशाचा वीज निर्मिती प्रकल्पाला पुरवठा; घोटाळा लपविण्यासाठी वापरली ‘ही’ क्लुप्ती

कोरडी महानिर्मिती प्रकल्पासाठी निघालेला कोळशाचा ट्रक अन्यत्र नेत त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा माती मिश्रीत कोळसा पाठवण्याचा प्रकार कोराडी वीज प्रकल्पात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महानिर्मितीने खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    नागपूर (Nagpur) : कोरडी महानिर्मिती प्रकल्पासाठी निघालेला कोळशाचा ट्रक अन्यत्र नेत त्याऐवजी निकृष्ट दर्जाचा माती मिश्रीत कोळसा पाठवण्याचा प्रकार कोराडी वीज प्रकल्पात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महानिर्मितीने खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चौकशीत कोळसा ट्रककरिता बनावट नंबर प्लेट (fake number plates) व स्टीकर लावून हा गोरखधंदा सुरु असल्याचे तपासात उघड झाले.

    महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात रस्तामार्गे विविध कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठीचे कंत्राट कंपनीने दिले आहे. यानुसार, २८ सप्टेंबरला वेकोलिच्या गोंडेगाव कोळसा खाणीतून रात्री एक वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच २२ एए ३४१४ आला असता काही अनोळखी इसमांनी वीज केंद्राच्या सुरक्षा रक्षकांना या ट्रकच्या नंबर प्लेटवर दुसऱ्या गाडीचे स्टीकर लावण्यात आले असल्याची माहिती दिली. त्यानुसार तातडीने ट्रकची तपासणी करण्यात आली असता, गाडीच्या क्रमांकावर एमएच ४० बीजी ०९०१ हे स्टीकर आढळले.

    यासंबंधी वीजकेंद्र प्रशासनाने सखोल चौकशी केली असता वाहन क्रमांक एमएच २२ एए ३४१४ हे भानेगाव टी-पॉइंट येथे कोळसा भरून उभे होते. तसेच सदर वाहन क्रमांकाचे जीपीएस उपकरण हे वाहन क्रमांक एमएच ४० बीजी ०९०१ या वाहनात परस्पररीत्या बदलण्यात आले होते. याप्रकाराची खापरखेडा पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित वाहतूक कंत्राटदाराने चांगल्या प्रतीचा कोळसा भरलेल्या ट्रकची नंबर प्लेट बदलत त्याऐवजी निकृष्ट प्रतीचा कोळसा भरलेला ट्रक पाठवला. यामुळे कंपनीला ८० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

    नियुक्त कर्मचाऱ्यांचीही करणार चौकशी
    मेसर्स बीएमएच या कंपनीला कोराडी वीज केंद्रातर्फे कोळसा वाहतुकीवर जीपीएसआर एफआयडीद्वारे नियंत्रण व पाळत ठेवण्याचे कंत्राट दिले आहे. या वाहनामध्ये आरएफआयडी लागले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद असून कंपनी मालक व सुपरवायझर यांचीही चौकशी केली असल्याचे महानिर्मितीने कळवले आहे.