
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून निर्धारित वेळेपेक्षा जास्त (पहाटेपर्यंत) ग्राहकांना बसवून जेवण, खाण-पिणे केले जाते, अशी माहिती डीसीपी विनिता साहू यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने सोमवारी मध्यरात्री रूफ नाईनवर छापा घातला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळली.
नागपूर (Nagpur) : धरमपेठेतील बहुचर्चित लाहोरी बारच्यावर असलेल्या रूफ नाईन तसेच सीताबर्डीतील गॉडफादर रेस्टॉरेंटमध्ये डीसीपी विनिता साहू (DCP Vinita Sahu) यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री छापा घातला. निर्धारित वेळ संपूनही रूफ नाईनमध्ये (Roof Nine) मोठ्या प्रमाणात ग्राहकांना खाद्य पदार्थ दिले जात असल्याचे आढळून आले तर गॉडफादरमध्ये (Godfather) चक्क हुक्का पार्लर (hookah parlor) चालविले जात असल्याचे उघड झाले.
धरमपेठेतील लाहोर बार वेगवेगळ्या प्रकारामुळे नेहमीच चर्चेत असतो. वरच्या माळ्यावर बांधण्यात आलेल्या रूफ नाईन रेस्टॉरेंटमध्येही यापूर्वी अनेकदा पोलीस कारवाई झाली आहे. एकदा हे अवैध बांधकाम तोडण्यातही आले होते. मुळ मालक शर्माने हे आता दुसऱ्याला चालवायला दिले असून तेथे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून निर्धारित वेळेपेक्षा जास्त (पहाटेपर्यंत) ग्राहकांना बसवून जेवण, खाण-पिणे केले जाते, अशी माहिती डीसीपी विनिता साहू यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलीस पथकाने सोमवारी मध्यरात्री रूफ नाईनवर छापा घातला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळली. कुणाकडेही मास्क नव्हते आणि ग्राहकांना खाण्यापिन्याचे पदार्थ पुरविले जात असल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी रूफ नाईनचा व्यवस्थापक शुभम प्रफुल्ल जयस्वाल (वय ३०, रा. समता लेआऊट, अंबाझरी), प्रेमकुमार रायभान शेंडे (वय ३६, रा. खडगाव रोड वाडी) , सय्यद इफ्तेहार सय्यद मुख्तार (वय३९, रा. नवीन वस्ती टेका) तसेच शारदाप्रसाद चिंतामणी पांडे (वय ४६, रा. गुप्तानगर, सुरेंद्रगड) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सीताबड्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हुक्क्याचा धूर अन् तरुण-तरुणी
दुसरी कारवाई सोमवारी रात्री गिरीपेठमधील गॉडफादर कॅफेमध्ये करण्यात आली. येथे तरुण-तरुणी हुक्क्याच्या धुरात हरविल्याचे चित्र होते. हुक्का प्रतिबंधित असताना देखिल एका ग्राहकाकडून हजार ते दोन हजार रुपये घेऊन तासाभरासाठी हुक्का पॉट दिला जातो. शहरातील मोहक्या ठिकाणी ही सेवा असल्याने तेथे ग्राहकांच्या उड्या पडतात. पोलिसांना आम्ही सांभाळून घेतो, अशी हमी मिळत असल्याने येथे दिवसरात्र तरुण-तरुणींच्या उड्या पडतात. पोलिसांनी सोमवारी रात्री छापा घालताच ग्राहकांसह गॉडफादरच्या मालक- व्यवस्थापकाचीही नशा उतरली. फोटो-व्हिडीओत येऊ नये म्हणून ते तोंड झाकू लागले. पोलिसांनी कोफ्टा कायद्यानुसार तसेच साथरोग कायद्यानुसार मालक, व्यवस्थापक आणि ग्राहक अशा १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.