एकाच महिलेला तब्बल तीन वेळा साप चावला; रामटेक तालुक्यातील घटना

काय चावले हे शोधण्यास तिने पलंगाखाली पाहिले असता तिला ४ ते ५ फुटाचा विषारी साप चावल्याचे लक्षात आले. यामुळे कुटुंबीय घाबरले. तिला श्वसनाचा त्रास झाला व ती बेशुद्ध झाली.

    नागपूर (Nagpur): रामटेक तालुक्यातील एका महिलेला तब्बल तीन वेळा साप चावला. अत्यवस्थ असल्याने तिच्यावर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार झाले. ही महिला दोन चिमुकल्यांची आई असल्याचे कळल्यावर औषधशास्त्र विभागातील डॉक्टरांनीही पूर्ण कौशल्य पणाला लावले. यशस्वी उपचाराने महिला बरी झाल्यावर तिला शनिवारी मेडिकलमधून सुट्टी दिली गेली. दरम्यान, महिलेने डॉक्टरांना मिठी मारली यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते.

    शामकला माहुले यांना पंधरा दिवसांपूर्वी तिच्या दोन मुलांसह घरात झोपल्या होत्या. रात्री काहीतरी चावल्याचे लक्षात आले. त्याकडे एखादा उंदीर किंवा कीडा असेल म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्यांदासुद्धा तसेच होऊनही पुन्हा दुर्लक्ष केले. मात्र तिसऱ्यांदा चावल्याने ती झोपेतून उठली. काय चावले हे शोधण्यास तिने पलंगाखाली पाहिले असता तिला ४ ते ५ फुटाचा विषारी साप चावल्याचे लक्षात आले. यामुळे कुटुंबीय घाबरले. तिला श्वसनाचा त्रास झाला व ती बेशुद्ध झाली.

    कुटुंबीयांनी तिला त्वरित मेडिकलमध्ये आणल्यावर जीवनरक्षण प्रणाली लावण्यात आली. असे मेडिकलमधील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बन्सल यांनी सांगितले. तिच्यावर डॉ. दीप्ती चांद, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. अयान यांच्या नेतृत्वात डॉ. सृजन खंडेलवाल, डॉ. सजल बन्सल, डॉ. स्नेहा, डॉ. रुची, डॉ. मयुरी, डॉ. विशाल बोकडे, डॉ. प्रशांत, डॉ. देवेंद्र, डॉ. अजिंक्य यांच्या पथकाने उपचार केले. १५ दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. डॉ. चांद व डॉ. व्यवहारे यांच्या सल्ल्यानुसार उपचारानंतर हळूहळू प्रकृती सुधारू लागली. ठणठणीत झाल्यानंतर तिला सुटी देण्यात आली. यावेळी तिने पानावलेल्या डोळ्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. ‘माझ्या दोन लहान मुलांसाठी तुम्ही नवीन आईला जन्म दिला’, असे सांगितले.