फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होणार

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागातील बरीच कामे झाली. त्यापैकी 6500 कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे. पण या चौकशीला 2 वर्षे का लावले, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. आताही एक महिना नाही तर सर्व यंत्रणा वापरून त्वरित चौकशी करावी, असे ते म्हणाले.

  नागपूर (Nagpur) : फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या 6500 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी होणार आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून 15 दिवसांत चौकशी करावी, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना दिली.

  देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागातील बरीच कामे झाली. त्यापैकी 6500 कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे. पण या चौकशीला 2 वर्षे का लावले, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. आताही एक महिना नाही तर सर्व यंत्रणा वापरून त्वरित चौकशी करावी, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत. म्हणून ही चौकशी केली जाते. फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस–राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कौतुक केले होते. आता त्याच कामाची चौकशी करत आहेत. पण यातून काहीही निघणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

  चौकशी करण्याची धमक नाही
  ही चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं उशीर का केला, असा प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. आता चौकशीचा अहवाल जनतेसमोर आणला पाहिजे. खरे म्हणजे महाविकासआघाडीतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे सरकारमधील काहींनी आता चौकशी करतो, अशी भीती दाखविणे सुरू केले. विरोधी पक्षावर दबाव बनविण्याकरिता हे सारे सुरू आहे. खरं म्हणजे चौकशी करण्याची धमक या सरकारमध्ये नाही, असेही ते म्हणाले.

  राज्य सरकारकडे काहीच कामे नसल्याने ओरड
  चौकशीसाठी पोलीस, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दक्षता विभाग या सर्वांना कामाला लावावे. त्यामुळं 1 डिसेंबरपूर्वी चौकशी होईल. खरं तर फडणवीस सरकारमधील ऊर्जा खात्याचा परफार्मन्स एक नंबरचा होता. हे राज्याची जनता सांगेल. यापूर्वी फडणवीस सरकारमधील जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी झाली. त्यातून काहीच बाहेर आले नाही. ऊर्जा विभाागाच्या चौकशीचेही हेच होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावेळीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे की, फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जाखात्याची कामे सर्वोत्कृष्ट झाली. आता त्यांच्याकडे काहीच कामे नसल्याने अशी ओरड सुरू आहे. पण, त्यातून काहीही बाहेर येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.