Time hurts; A young man from Nagpur died of an electric shock for a kite

सर्वजण पतंगोत्सवाचा आनंद लुटत असतांना साहू परिवारावर दुःखाचे ढग ओढवले आहे. महिन्याभरापूर्वी थाटलेला सुखाचा संसार सुरू होताच संपला.

    नागपूर : शुक्रवारी संक्रांतीच्या निमित्ताने आकाश पतंगांनी गजबजलेले होते. सर्वजण पतंगोत्सवाचा आनंद लुटत असतांना साहू परिवारावर दुःखाचे ढग ओढवले आहे. महिन्याभरापूर्वी थाटलेला सुखाचा संसार सुरू होताच संपला. नागपूर येथे विजयनगरात राहणारा तुलेश साहू (२४) वॉटर प्रुफिंगची कामे करीत होता. पतंगोत्सवात पतंगाच्या मागे धावला. विजेच्या तारेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल नागपुरातील कळमना भागात घडली आहे.


    विजयनगर येथे राहणार तुलेश शाहू हा आपल्या कुटूंबासमवेत आनंदाने राहत होता. महिनाभरापूर्वीच त्याचे लग्न नताशा सोबत झाले होते. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास तो आपल्या घराच्या गच्चीवर उभा राहून पतंगोत्सवाचा आनंद घेत होता. त्यावेळी, त्याची नजर अचानक  घराच्या छतावरून गेलेल्या हायटेंशन लाईन मध्ये अडकलेल्या पतंगावर गेली. तुलेश पतंग काढण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याने पतंग काढण्यासाठी पडद्याचा पाईप घेतला. त्या पाईपच्या मदतीने तो पतंग काढत होता. तिथेच त्याची चूक झाली. तो पाईप हायटेंशन लाईनला लागल्यामुळे तुलेशला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याच क्षणी तो जमिनीवर पडला. त्याला बेशुद्धावस्थेत लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुगणालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


    त्याचा मागे कुटुंबात आईवडील, तीन विवाहित बहिणी आणि नुकतेच लग्न झालेली त्याची पत्नी आहे. काळाने घाला घातला आणि त्याची पत्नी महिनाभरातच विधवा झाली. जोडीदारासोबत अगदी कमी कालावधीचा लाभलेला सहवास तिच्या जिव्हारी लागत आहे. तिच्यावर काल खऱ्या अर्थाने संक्रांत कोसळली आहे.