पतीने डायनिंग टेबल घेऊन न दिल्याने पत्नीची आत्महत्या; बेसा परिसरात हळहळ

संगीता पाटील या हुडकेश्वरमधील बेसा परिसरातील टेक ऑफ सिटीच्या सी विंगमध्ये राहत होत्या. संगीता या गृहिणी असून पती राजन पाटील हे खाजगी नोकरी करतात. काही महिन्यांपासून संगीता या घरात डायनिंग टेबल घेण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी पतीला वारंवार हट्ट केल्यानंतर .....

    नागपूर (Nagpur) : घरातील आर्थिक अडचणीमुळे दिवाळीत डायनिंग टेबल घेऊन देण्याचे आश्‍वासन पतीकडून पूर्ण झाले नाही. परंतु पत्नीने डायनिंग टेबलसाठी हट्ट धरत गळफास लावून आत्महत्या केली. संगीता राजन पाटील (४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    प्राप्त माहितीनुसार, संगीता पाटील या हुडकेश्वरमधील बेसा परिसरातील टेक ऑफ सिटीच्या सी विंगमध्ये राहत होत्या. संगीता या गृहिणी असून पती राजन पाटील हे खाजगी नोकरी करतात. काही महिन्यांपासून संगीता या घरात डायनिंग टेबल घेण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी पतीला वारंवार हट्ट केल्यानंतर दिवाळीत डायनिंग टेबल घेऊन देईल, असे आश्‍वासन पतीने दिले.

    दिवाळी सणाची खरेदी झाल्यानंतर संगीता यांनी आपल्या पतीकडे डायनिंग टेबलबाबत विचारणा केली. परंतु, दिवाळीत झालेला खर्च बघता त्यांनी आणखी काही दिवस थांबण्यासाठी पत्नीची मनधरणी सुरू केली. परंतु, ती समजून घ्यायला तयार नव्हती. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सकाळपासूनच त्यांनी पतीकडे डायनिंग टेबलसाठी हट्ट धरला होता. पतीने डायनिंग टेबल घेऊन देण्यास दिलेला नकार संगीता यांच्या जिव्हारी लागला.

    संतापलेल्या संगीता यांनी शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पती राजन शंकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहे. घरगुती सामानासाठी जिद्द करून ती पूर्ण न झाल्यामुळे आत्महत्या करण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी.